मुंबई : अंगाची लाहीलीही करणारं ऊन मुंबईकरांनी सहन केलं. पण आता कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यातच शनिवार-रविवार असल्याने मुंबईकर विकेंडचा आनंद घेत आहेत. विंकेड आणि पहिला पाऊस ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्हवर आले आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत मजा करण्यासाठी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर गर्दी केली आहे. काहीजण आपल्या कुटुंबासोबत पावसाचा आनंद लुटण्यासाठी मरीन ड्राईव्हवर आले आहेत.
पावसाळ्याचा अर्धा महिना उलटून गेल्यानंतर मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्यातच आज 24 तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. याचसाठी आज रविवारच्या निमित्ताने अनेक मुंबईकर नागरिक हे मुंबई समुद्र किनारपट्टीवर फेरफटका मारण्यासाठी आले आहेत.
आज होत असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्रात हाय टाईडदेखील होणार आहेत. याच साठी समुद्रावर जास्त प्रमाणात गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांचा देखील पहारा ठेवण्यात आला आहे.
मरीन ड्राईव्हवर आलेल्या मुंबईकरांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद झाला. तेव्हा मौसम बडा सुहाना है, सुकून है यहाँ पर…!, असं त्यांनी सांगितलं.
आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. अशातच मुंबईकर क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये आले आहेत. अशातच पाऊस पडतोय. त्यामुळे पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी दादर शिवजी पार्क मैदानात क्रिकेट खेळत आनंद घेताना मुंबईकर दिसत आहेत.
शिवाजी पार्क मैदानात पावसामुळे चिखल झाला आहे. याच चिखलात तरूणवर्ग क्रिकेट खेळत पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. खेळासह पावसाचा आनंद लुटणारी तरूणाई शिवाजी पार्कवर दिसत आहे.
दरम्यान, येत्या 24 तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.