मुंबई: कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने राज्य सरकारने 13 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 11 ते सकाळी सहा वाजता या वेळेत ही संचारबंदी लागू असेल. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. (State govt Night Curfew decision will hamper Hotel industry in Mumbai)
त्यासाठी हे हॉटेल व्यावसायिक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते. कोरोनाच्या काळात निर्बंधांमुळे अगोदरच हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. आता ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेल्समध्ये पुन्हा पहिल्यासारखी वर्दळ पाहायला मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्य सरकारच्या नाईट कर्फ्युच्या निर्णयामुळे या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी यावर तोडगा काढण्यासाठी आता हॉटेल व्यावसायिक शरद पवार यांची भेट घेऊ शकतात.
संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.
ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.
संबंधित बातम्या:
नव्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई सज्ज, लंडन रिटर्नवाल्यांची बडदास्त, स्पेशल रिपोर्ट
केईएम, शीव, कूपर, नायरसह 8 ठिकाणी लसीकरण केंद्रे; वाचा मुंबईत कुठे, कसे होणार लसीकरण!
कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
(State govt Night Curfew decision will hamper Hotel industry in Mumbai)