‘मोदी की गॅरंटी’ घोषणेवर संजय राऊतांचा घणघात; अशोक चव्हाण यांचा दाखला देत म्हणाले…
Saamana Editorial on BJP Modi Ki Garanti Slogan : भाजप काँग्रेसशिवाय एक इंचही पुढे जाऊ शकत नाही; संजय राऊतांचा निशाणा. 'मोदी की गॅरंटी' घोषणेवरही घणाघात. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? सामनाच्या अग्रलेखातत नेमकं काय म्हणण्यात आलं आहे? वाचा सविस्तर....
मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूक नजरेच्या टप्प्यात आली आहे. अशात भाजपकडून ‘मोदी की गॅरंटी’ हे घोषवाक्य वापरलं जात आहे. यावर विरोधक टीका करत आहेत. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावर टीकास्त्र डागलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून या घोषवाक्यावर निशाणा साधण्यात आला आहे. महाविकास आघाडी काँग्रेसमधील नेत्यांना भाजपत घेण्यावरून सामनातून टीकास्त्र डागण्यात आलं आहे. अशोक चव्हाण यांना भाजपत घेऊन राज्यसभेचं तिकीट देण्यावर टीका करण्यात आली आहे. ‘मोदी गॅरंटी -काँग्रेस सोडा; राज्यसभेत जा!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
एकीकडे ‘काँग्रेसमुक्त भारत’ आणि दुसरीकडे ‘शून्य विरोधीपक्ष’ असे दुहेरी धोरण मोदी सरकार कसलीही चाड न बाळगता राबवीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांतील आमदार-खासदारांची भाजपला आलेली सूजयाच धोरणाचा परिणाम आहे . ‘ काँग्रेसमुक्त भारत ‘ च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता ‘ काँग्रेसयुक्त भाजप ‘ होत असल्याच्या दारुण वास्तवाचीही जाणीव या मंडळींना राहिलेली नाही . काँग्रेस सोडा आणि राज्यसभेत जा , हा सध्या भाजपचा मूलमंत्र बनला आहे व हिच मोदींची गॅरंटी बनली आहे . महाराष्ट्रातील अशोक चव्हाण आणि हिमाचल प्रदेशातील हर्ष महाजन हे काँग्रेसजन याच गॅरंटीचे लाभार्थी ठरले आहेत . ‘ काँग्रेसमुक्त भारत ‘ च्या नादात वेडापिसा झालेला भाजप त्याच काँग्रेसशिवाय एक इंचही पुढे जाऊ शकत नाही , हेच पुन्हा सिद्ध झाले आहे !
राज्यसभेच्या 15 जागांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेनुसार क्रॉस व्होटिंग झालेच. हे क्रॉस व्होटिंग किंवा घोडेबाजार भाजपकडून शंभर टक्के होणार ही खात्रीही खरी ठरली. उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये घोडेबाजाराच्या जोरावर भाजपने त्यांचा जास्तीचा एकेक उमेदवार निवडून आणला. उत्तर प्रदेशात त्याचा धक्का समाजवादी पार्टीला बसला. त्यांचे दोन उमेदवार निवडून आले, परंतु एकाचा पराभव झाला. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रख्यात वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव हा जास्त धक्कादायक ठरला.
राज्यात काँग्रेसची सत्ता आणि पुरेसे संख्याबळ असूनही सिंघवी भाजपच्या घोडेबाजारामुळे पराभूत झाले. समसमान मते पडल्यानंतर त्यांच्याच नावाची ‘ईश्वरी चिठ्ठी’ निघूनही नियमाचा फटका त्यांना बसला व भाजपचे हर्ष महाजन विजयी घोषित झाले. राज्यसभा निवडणुकीला क्रॉस व्होटिंग किंवा घोडेबाजाराची परंपरा जुनीच आहे. मात्र देशात मोदी राजवट आल्यापासून या घोडेबाजाराला ‘सरकारी कोंदण’ मिळाले आहे. लोकशाही मूल्ये, नीतिमत्ता, निवडणुकीचे संकेत आणि भाजप यांची फारकतच झाली आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षांत सर्वच निवडणुकांमध्ये भाजपवाल्यांचे ‘घोडे’ जास्तच उधळत आहेत.