राज्याची अवस्था कमालीची बिकट, मिंधे-फडणवीसांचे गुंडाराज!; संजय राऊतांचा घणाघात
Saamana Editorial on CM Eknath Shinde Devendra Fadnavis : महाराष्ट्राची 'वाट' चुकली आहे, त्यामुळे राज्याची वाट लागलेली दिसतंय हे तर गुंडांचं राज्य; संजय राऊतांचा थेट शाब्दिक हल्ला... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा, वाचा सविस्तर...
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेवरून महाविकास आघाडीने शिंदे सरकारला घेरलं आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. मिंधे-फडणवीसांचे गुंडाराज! उलथवून टाका! या शीर्षकाखाली सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं संजय राऊतांनी या अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
राज्याची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने ही बिकट परिस्थिती किती टोकाला गेली ते दिसले. पोलीस पक्षपाती बनले आहेत व आपापल्या टोळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच मोक्याच्या जागी नेमून सरकारपुरस्कृत गुंडांना संरक्षण दिले जात असेल तर दुसरे काय होणार?
महाराष्ट्र हा नेहमीच देशाचा मार्गदर्शक राहिला. महाराष्ट्राच्या वाटेने देश पुढे गेला. आज महाराष्ट्राची ‘वाट’ चुकली आहे. त्यामुळे राज्याची वाट लागलेली दिसत आहे. राज्यात लुटारू टोळय़ा व भामट्यांना बरे दिवस आले आहेत. असे घडते तेव्हा राष्ट्र लयास जाते. महाराष्ट्राचे तसेच होत आहे. घोसाळकरांच्या हत्येने महाराष्ट्राच्या पापण्या ओलावल्या. त्या पापण्यांतून ठिणग्याही उडतील, हे गुंडांचे राज्य पोसणाऱ्यांनी लक्षात ठेवावे!
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र हे देशातील सगळय़ात असुरक्षित राज्य बनले आहे. रोज कोठे ना कोठे हत्या होत आहेत व राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री ‘शेमलेस’ पद्धतीने यातील गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंडांचे राष्ट्र झाले की काय? असे वाटू लागले आहे. अभिषेक घोसाळकर या तरुण-तडफदार शिवसेना पदाधिकाऱयाची गुरुवारी संध्याकाळी हत्या झाली. अभिषेकवर अंदाधुंद गोळीबार करून मारेकऱयाने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. त्यामुळे या प्रकरणातील संशय वाढला आहे.
महाराष्ट्राला हादरा देणाऱया मुंबई शहरात कल्लोळ माजवणाऱ्या या हत्येने मुख्यमंत्री व त्यांच्या गृहमंत्र्यांच्या तोंडावरील रेषादेखील हलली नाही. ”या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. काल घडलेली घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडली. याला राजकीय रंग देणे योग्य नाही,” असे गृहमंत्री म्हणतात. अभिषेक याचे मारेकऱ्याशी काय वाद होते याचा तपास अद्यापि व्हायचा आहे, पण गृहमंत्र्यांनी जाहीर करून टाकले, वैयक्तिक भांडणातून हत्या झाली. म्हणजे या घटनेवर पडदा टाकून तपास गुंडाळण्याचा हा प्रयत्न आहे.
हत्यारा मॉरिसभाईचे अलीकडे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वर जाणे-येणे होते व मुख्यमंत्र्यांशी त्याच्या भेटीगाठी झाल्या हे सत्य गृहमंत्री नाकारणार आहेत काय? अभिषेक घोसाळकर हा अत्यंत विनम्र व अजातशत्रू होता. त्यामुळे वैयक्तिक वैमनस्यातून त्याची हत्या झाल्याची वायफळ बडबड गृहमंत्री का करीत आहेत? ते कोणाच्या अपराधावर पांघरुण घालत आहेत? महाराष्ट्रात गुंडगिरीचा उन्माद वाढला आहे व घोसाळकरांची हत्या हे त्या उन्मादाचे टोक आहे. म्हणून अपयशी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करताच फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दळभद्री तसेच फासणारे आहे.