मुंबई | 04 मार्च 2024 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. आधी भाजपने गंभीर आरोप केले नंतर लगेच अजित पवारांना महायुतीत घेतलं. यावरून संजय राऊतांनी घणाघात केला आहे. हा तर नाहक बदनामीचा प्रकार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटलाच चालवायला हवा!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. भाजपच्या मांडीवर! शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
भ्रष्टाचारी मंडळींवर आधी आरोप करायचे व मग निर्लज्जपणे त्यांना मांडीवर घेऊन बसायचे. गेल्या दहा वर्षांत जेवढे घोटाळे झाले ते गेल्या 70-75 वर्षांत झाले नसतील. गेल्या दहा वर्षांत खोटेपणाचे जेवढे उंच डोंगर उभे केले, त्यापुढे हिमालयाची उंचीही तोकडी पडेल.
हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ यांच्याप्रमाणे आता अजित पवारांनाही शांत झोप लागायला सुरुवात होईल. राज्य बँक घोटाळ्यामुळे अजित पवारांना नाहक मनस्ताप झाला. त्यांना कुटुंब-पक्षाचा त्याग करावा लागला. बदनामी झाली ती वेगळीच. सुनेत्रा पवार, फडणवीसांवर बदनामीचा खटलाच दाखल करा!
ज्या राज्य बँक घोटाळय़ात देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते, हा त्यांचा आत्मनिर्धार होता, त्या घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला. अजित पवारांविरोधात पोलिसांना काहीच ठोस सापडत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. अशा तऱ्हेने भाजपने पवारांना एकापाठोपाठ एक असा दिलासा देण्याचा सपाटाच लावला आहे. अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यांवर फडणवीस यांनी तांडव केले होते. महाराष्ट्रात जनतेचा पैसा पवारांनी व त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नव्हे, तर आपल्याकडे पुरावे असल्याचे ते सांगत होते. आता या पुराव्यांचे काय झाले? हे पुरावे त्यांनी गिळून ढेकर दिला की आणखी काही केले? भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना साथ देण्याची ‘मोदी गॅरंटी’ फडणवीस यांनी अमलात आणली ती अशी. फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्य़ाचे पुरावे नष्ट केले असतील तर त्या आरोपाखाली फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.
पुराव्यांशी छेडछाड करणे हा अपराध आहे. पोलिसांनी पुरावा असतानाही कुणाच्या दबावामुळे अजित पवारांची शिखर बँक घोटाळा फाईल बंद केली असेल तर महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुंबईच्या पोलीस आयुक्तांना ‘पार्टी’ करून हायकोर्टातदेखील दाद मागायला हवी. कारण ‘भ्रष्टाचार भ्रष्टाचार’ असे ओरडत राहून जमिनीवर काठ्या आपटायच्या व माहौल निर्माण करायचा हे यांचे धंदे आहेत. तिसरा पर्याय म्हणजे समाजसेविका सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी, कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या सबबीखाली देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांवर अब्रुनुकसानीचा खटलाच चालवायला हवा!