मुंबई | 08 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय आला. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. दुसऱ्या आयतोबांना ‘राष्ट्रवादी’ मिळाली! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. नरेंद्र मोदी- अमित शाहांची अप्रामाणिक गॅरंटी आणि निवडणूक आयोगाची घटनाबाह्य झुंडशाही यांचा पराभव महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. तसंच अजित पवार गट आणि शिंदेगटावर जोरदार निशाणा साधण्यात आल आहे.
उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष जनमानसात रुजलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या कागदी निर्णयाने त्यांच्या अस्तित्वावर फरक पडणार नाही. निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे श्री. शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल. शिवसेना असे अनेक घाव झेलून उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांनी झंझावात निर्माण केला आहे. शरद पवारही अनेक वादळे व संकटे झेलून उभेच आहेत. निवडणूक आयोग महाराष्ट्राचा हा उत्साह कसा संपवणार? मोदी-शहांची अप्रामाणिक गॅरंटी आणि निवडणूक आयोगाची घटनाबाह्य़ झुंडशाही यांचा पराभव महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही!
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भारताचा निवडणूक आयोग सत्यास धरून प्रामाणिक निर्णय घेईल याची शक्यताच नव्हती. कारण निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून तो मोदी-शहांचा झाला आहे. अशा संविधानिक संस्थांच्या गळ्यात हुकूमशहांचे पट्टे बांधले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? म्हणूनच शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्याच पक्षातील फुटीर आयतोबा अजित पवार यांच्या हवाली केला याचे आश्चर्य पिंवा खंत वाटण्याचे कारण नाही.
याच पद्धतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ‘आयतोबा’ एकनाथ मिंधे यांच्या हाती सोपवली गेली. म्हणजे तुम्ही बेइमानी करून, भ्रष्टाचार करून भाजपच्या गोटात या, आम्ही तुमचा ‘पक्ष’ तुमच्या ताब्यात देतो, हीच ‘मोदी गॅरंटी’ आहे व लोकशाहीसाठी तो सगळय़ात मोठा धोका आहे.
मिंधे यांना शिवसेना व अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस देऊन भाजपवाले त्यांचा राजकीय स्वार्थ असा काय साधणार आहेत? हे लोक महाराष्ट्रीय जनतेला मूर्ख समजले काय? जेथे ‘ठाकरे’ तेथेच शिवसेना व जेथे ‘शरद पवार’ तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, हाच महाराष्ट्रीय जनतेचा मानस आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 42 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार आता अमित शहा यांनी केला आहे. देशभरात ते 400 पार करणार आहेत. यावर राष्ट्रीय जनता दलाच्या मनोज झा यांनी उत्तर दिले आहे, ”तुम्ही नेमका आकडा सांगताय याचा अर्थ त्या पद्धतीने ‘ईव्हीएम’ सेट झाल्या आहेत.” देशातल्या लोकशाहीचे हे दशावतार आहेत.