पंतप्रधानांना जात असते काय?; आइन्स्टाइनचा दाखला देत संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल
Saamana Editorial on PM Narendra Modi : ...त्यामुळे नरेंद्र मोदींना आइन्स्टाइन त्यांना कधीच भेटणार नाहीत!; संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोपरखळी... शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचं उदाहरण देत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे. संजय राऊत नेमकं काय म्हमालेत? वाचा...
मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करण्यात आला आहे. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या भेटीवर सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधानांना जात असते काय? या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. देशाच्या पंतप्रधानपदी बसणाऱ्या व्यक्तीला जात नसते. मात्र मोदी त्यांनी जात वारंवार सांगतात. जातीचा उल्लेख करतात, त्यामुळे अल्बर्ट आइन्स्टाइन त्यांना कधी भेटणार नाहीत!, अशी कोपरखळी ठाकर गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून मारली आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
खरोखरच अल्बर्ट आइन्स्टाइन जीनियस होते. त्यांनी नेहरूंचे महानपण पहिल्या भेटीतच ओळखले. 56 वर्षांपूर्वी नेहरू गेले तरी त्यांचे हे मोठेपण कायम आहे. महान नेहरू यांनी जात-धर्मनिरपेक्ष देश घडविण्याचा सफल प्रयत्न केला. स्वतःच्या जातीचा प्रचार करून राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. धर्माच्या अफूची गोळी व जातीचा गांजा त्यांनी लोकांना दिला नाही. त्यांनी ज्ञान-विज्ञानाचा मंत्र चिरंजीव केला. त्यामुळे वारंवार स्वतःच्या जातीचा उद्धार करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. मोदी हे स्वतःची जात रोज सांगतात. खरे तर पंतप्रधानपदावरील व्यक्तीस ‘जात’ नसते. मोदी हे मात्र जातीत रमतात! त्यामुळे आइन्स्टाइन त्यांना कधीच भेटणार नाहीत!
राजकारणात एखाद्याकडे सांगण्यासारखे फार काही नसले की तो स्वतःच्या जातीवर येतो. स्वतःची जात काढतो. जातीबाबत हातघाईवर येतो. पंतप्रधान मोदी यांनी तेच केले आहे. पंतप्रधान स्वतःची जात वगैरे सांगून रडायला लागतो व त्यावर मते मागतो तेव्हा बेशक समजावे, या पंतप्रधानाने जनतेसाठी व देशासाठी काहीच केलेले नाही व जात हाच त्याचा मुख्य आधार आहे.
केंद्रात भाजपचे राज्य आल्यावर त्यांनी आपल्या मोढ घांची जातीचा समावेश ‘ओबीसी’त केला. मोदी गुजरातच्या सधन व समृद्ध जातीत जन्मास आले व राजकीय लाभासाठी त्यांनी स्वतःची जात ‘ओबीसी’त घातली. त्यामुळे मोदी यांचा ते ‘ओबीसी’ वगैरे असल्याचा आक्रोश खोटा आहे. गुजरात सरकारच्या समाज कल्याण विभागाने 25 जुलै 1994 रोजी एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार नव्या 36 जाती ओबीसी प्रवर्गात सामील केल्या. त्यातील 25(ब) क्रमांकावर मोढ घांची जातीचा समावेश असून त्या जातीस ओबीसीमध्ये सामील केले गेले.
आता आपले पंतप्रधान मोदी हे ज्या श्रीमंत मोढ घांची जातीतून आले ती जात नेमकी आहे तरी काय? या जातीचे लोक घाण्यापासून बनवल्या जाणाऱया तेलाचा व्यापार करतात व त्या व्यापारातून ते बऱयापैकी समृद्ध झाले. ही जात गरीब पिंवा गरीब रेषेखाली नसल्याचे सांगितले जाते. अर्थात ते काही असले तरी दहा वर्षे व्यक्तीने आपण ‘ओबीसी’ जातीचे असल्याचा आक्रोश करणे योग्य आहे काय?
नेहरू जगभरातील तंत्रज्ञान, शास्त्रज्ञांत रमले. 1949 साली नेहरू अमेरिकेत गेले व अल्बर्ट आइन्स्टाइन यांना भेटले. भेट संपल्यावर नेहरू आइन्स्टाइन यांना म्हणाले, ”सर, आपण जीनियस आणि महान आहात. येणाऱ्या पिढ्या आपले सदैव स्मरण ठेवतील.” यावर आइन्स्टाइन यांनी उत्तर दिले, ‘मि. नेहरू, कोण किती महान हे 21 व्या शतकात कळेल.” आइन्स्टाइन यांच्या या उत्तरात एक गर्भित अर्थ दडला होता. त्या भेटीच्या 70 व्या वर्षानंतर प्रत्येक भारतीय नागरिकाला समजले की, आइन्स्टाइन शंभर टक्के खरे बोलले होते.