संसदेवरील ‘स्मोक’ हल्ल्याची चौकशी ईडी, इन्कम टॅक्सकडे सोपवली काय?; संजय राऊतांचा थेट सवाल
Saamana Editorial on Prliament Security Breach : संसदेवरील 'स्मोक' हल्ल्यामागेही पंडित नेहरू- काँग्रेस कारणीभूत आहे काय?, अमित शाह जाहीर कराच!; संजय राऊतांचा भाजपला टोला
मुंबई | 15 डिसेंबर 2023 : राजधानी दिल्लीत संसदेत जात चार जणांनी गोंधळ घातला. यातील दोघांनी लोकसभेत जात गदारोळ माजवला. प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदारांच्या बाकांवर उड्या मारत दोन तरूणांनी धुडगूस घातला. या तरूणांकडे स्मोक कँडल होत्या. त्यामुळे संपूर्ण सभागृहाच पिवळ्या रंगाचा धूर झाला. तर दोन तरूणांनी संसदेबाहेर गोंधळ घातला. यात लातूरच्या एका तरूणाचाही समावेश होता. या सगळ्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. आजच्या सामनातूनही यावर भाष्य करण्यात आलं आहे. संसदेत विद्रोह! शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झालाय. यातून भाजपला काही सवाल करण्यात आले आहेत. तसंच पंडित नेहरूंचं नाव घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोलाही लगावण्यात आलाय.
सामना अग्रलेख जसाच्या तसा
देशाच्या सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेला भेदणाऱ्या संसदेवरील ‘स्मोक’ हल्ल्याची आता चौकशी सुरू आहे. या चौकशीची जबाबदारी ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’च्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे काय? गृहमंत्री, देशाच्या सुरक्षेचा, संविधान, कायदा-सुव्यवस्था असा सगळ्याचाच खेळखंडोबा झाला आहे.
तीन राज्यांच्या विजयात राजा मग्न आहे, पण प्रजा बेरोजगारी, महागाईने तळमळत आहे. खासदारांच्या सभागृहात विद्रोही तरुणांनी भावनेचा स्फोट घडवला. त्यांचा मार्ग चुकला. देशाच्या सुरक्षेशी, संसदेच्या प्रतिष्ठेशी त्यांनी खेळायला नको होते.
देश सुरक्षित असल्याच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. चीन लडाखच्या भूमीवर आत घुसला आहे, पाकडे अतिरेकी कश्मीरात घुसून जवानांचे रक्त सांडत आहेत, मणिपुरातील हिंसाचारात चीन व म्यानमारचा हात आहे आणि आता संसदेत बिनचेहऱयाचे पाच ‘भारतीय’ तरुण घुसले. सर्व काही ‘राम भरोसे’ चालले आहे. भारतीय जनता पक्ष व त्याच्या सुरक्षाविषयक धोरणांची पोलखोलच झाली आहे. दोन तरुण धुराची नळकांडी घेऊन संसदेत व सभागृहात घुसले आणि दोघांनी संसदेबाहेर हल्लाबोल केला. आता या हल्ल्यामागेही पंडित नेहरू व काँग्रेसचे धोरण कारणीभूत आहे काय? कालच्या हल्ल्यास नेहरूच जबाबदार आहेत हे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन एकदा जाहीर करून टाकावे.