मुंबई | 08 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच ज्या मतदार संघात आपला होल्ड आहे. अशा जागांवर विविध पक्षांकडून दावा केला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप अद्याप झालेलं नाही. अशातच महाविकास आघाडीत काही जागांवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मुंबईतील महत्वाचा मानला जाणारा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या जागेवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मिलिंद देवरा आणि ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या जागेवर दावा केला आहे.
मागच्या 50 वर्षापासून देवरा कुटुंब दक्षिण मुंबईतील लोकांसाठी काम करतं आहे. आमच्याकडे सत्ता असो की नसो आम्ही कायम लोकांची सेवा करतो आहोत. आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलेलो नाही. लोकांसोबत असलेल्या आमच्या नातेसंबंधांमुळे, लोकांसोबत असलेल्या ऋणानुबंधांमुळे आम्ही हा मतदारसंघ जिंकत आलो आहोत. कामांमुळे आम्ही ही जागा जिंकत आलो आहोत. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक सोपी जाणार नाही. कुणीही दावे करू नयेत, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही एक मीटिंग आयोजित केली. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कार्यकर्ता चिडलेले आहेत. गोंधळलेले आहे. यासाठी मी एक व्हीडिओ बनवला होता. त्यामध्ये नेत्यांनी जागेसाठी पब्लिकली दावा करू नये, असं म्हटलं, असंही मिलिंद देवरा म्हणालेत.
मिलिंद देवरा यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना राऊतांना प्रश्न विचारण्यात आला आहे. तेव्हा त्यांनी भाष्य केलं. दक्षिण मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे का? असा प्रश्न वितारण्यात आला. तेव्हा संजय राऊत म्हणाले, आमच्यात अशा ठिणग्या वगैरे पडत नाहीत. दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत दोन टर्म प्रतिनिधीत्व करत आहे. काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्या दाव्याबाबत अधिकृतपणे चर्चा केल्याची काही माहिती नाही, असं संजय राऊत म्हणाले.