विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात कुणाचं सरकार येणार? कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार? याबाबत चर्चा होत आहे. अशातच जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची स्पष्टता असावी. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केलाय. ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री, असं म्हणत निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबाबत ठरवू असं शरद पवार म्हणाले. त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात भाष्य केलं. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.
शरद पवार यांच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदासाठीची तीन नावं डोक्यात आहेत. ती मला माहिती आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांच्या डोक्यात काय आहे, हे जर देवेंद्र फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची ही अवस्था नसती, असं संजय राऊत म्हणालेत. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का? हे त्यांना कोणी सांगितलं. पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात… पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना आधी कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती!, असा घणाघात राऊतांनी केलाय.
फडणवीसांच्या आयुष्याची, राजकारणाची आणि प्रतिष्ठेची घसरण झालेली आहे. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही. 2019 साली शरद पवारांच्या डोक्यात काय होतं हे त्यांना कळलं नाही, पण झाले ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री… हिंमत असेल तर 2024 ला वेळेत निवडणुका घ्या. मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतंय. हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचं बंद होईल, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्याची परवानगीची गरज नाही. लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येतायेत, येऊद्यात. पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना… हेही होऊ शकतं. शाह काहीही करू शकतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत.