ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही जिंकलो अन् विरोधक हारले दाखवणं मूर्खपणा; राऊतांचा महायुतीवर निशाणा
Sanjay Raut on Gram Panchayat Election 2023 Result : ग्रामपंचायत निवडणूक, निकाल आणि महायुतीचा जल्लोष यावरून संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा साधला. घटनाबाह्य शिंदे सरकार फुसके बार वाजवतंय!, असा घणाघात त्यांनी केला आहे. छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवरही राऊत बोलले आहेत. वाचा सविस्तर...
गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : ग्रामीण महाराष्ट्राचा मूड सांगणारी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला आघाडीवर आहे. या यशानंतर महायुतीकडून सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतरचे फटाके घटनाबाह्य सरकार वाजवत आहे. ते फुसके फटाके आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राऊतांनी निशाणा साधला आहे.
ग्रामपंचायत निकालाचे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहेत. आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले, हे दाखवत आहेत हा एक मूर्खपणा आहे, असं संजय राऊत म्हणाले. या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. हे जर घटनाबाह्य सरकारला माहीत नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. हे अनाडी घोडे उधळलेले आहेत, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.
जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात. त्यांची हातभर फाटते. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे. जे 14 महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिका सह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं? ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे. त्यांचे आता फक्त आकड्यांचेच खेळ चालू आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. हा सगळा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. जातीपातीच्या नावावर हे राज्य फोडण्याचा एक षडयंत्र सुरू आहे. या राज्यात राजकीय अस्थिरता राहावी यासाठी प्रयत्न केला जातोय. यामुळे या ठिकाणचा रोजगार उद्योग हे बाजूच्या राज्यामध्ये जावेत. यासाठी टाकलेले डाव आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनी या डावांमध्ये फसू नये. या राज्यामध्ये सामाजिक एकता राहावी, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत. अशी शिवसेनेची भूमिका आहे, असं संजय राऊत म्हणालेत.