प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात का?; मायावतींचं उदाहरण देत राऊतांचं स्पष्ट उत्तर
Sanjay Raut on Prakash Ambedkar BJP Loksabha Election 2024 : प्रकाश आंबेडकर,जागावाटप अन् लोकसभा निवडणूक; ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलंय. तसंच आंबेडकर यांच्याबाबतही त्यांनी वक्तव्य केलंय. वाचा...
गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 06 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते. अशात जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत. जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईत आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं असेल. याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
संजय राऊत काय म्हणाले?
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात का, असा आरोप केला जातो. यावर तुमचं काय मत आहे?, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकरांचे पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ते आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते. पत्रकार होते. उत्तम पत्रलेखक होते. त्यांचा वारसा प्रकाश आंबेडकर लिखाणामध्ये चालवत असतील, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आंबेडकर पत्र उत्तम लिहितात वाचायची असतात, असं संजय राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर राऊत म्हणाले…
प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आम्हाला संशयास्पद वाटत नाही. आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आमचा मायावतींवर विश्वास नाही त्या भाजपाला अप्रत्यक्षरीत्या मदत करत आहेत. मायावतींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्या दबल्या गेलेल्या आहेत. पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही. ते महाराष्ट्रातल्या मातीतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत आणि ते मोदींची हुकूमशाही गाडण्यासाठी आमच्या सोबत उभे राहतील. भाजपला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कुठल्याही मदत होणार नाही. अशी मदत त्यांच्याकडून होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
वंचितने महाविकास आघाडीकडे 27 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार का? महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आजच्या महविकास आघाडीच्या बैठकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.