रोहित पवार, सुप्रिया सुळे अजित पवार भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, ते तिघे…
Sanjay Raut on Supriya Sule Ajit Pawar Rohit Pawar Meeting : लोकसभा निवडणूक अन् महाविकास आघाडीचं जागावाटप...; संजय राऊतांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर... रोहित पवार, सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, काय म्हणाले? वाचा सविस्तर...
मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडवर आज अनावरण झालं. या कार्यक्रमाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची पुण्यात भेट झाली. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये या तिघांची पाणी प्रश्नावर भेट झाली. कालवा समितीची बैठकीला हे दोघे उपस्थित होते. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सुप्रिया सुळे त्याच भागातून खासदार आहेत. रोहित पवार यांचा ही जवळ मतदारसंघ आहे. त्यामुळे ते सर्व शासकीय बैठकीला गेले असतील, असं संजय राऊत म्हणाले.
तुतारी चिन्हावर भाष्य
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील ११ कोटी जनता हयापुढे हातात मशाल घेऊन तुतारी वाजविणार आहोत. शरद पवारांना अत्यंत चांगलं चिन्ह मिळालेलं आहे. काल जे पी नड्डा यांनी अजित पवार आणि शिंदे समोर प्रश्न ठेवला आहे की तुम्ही कमळावर लढा असे म्हटलं आहे. कमलाबाईच्या पदरा खाली लपा… असा प्रस्ताव दिला आहे. जी चिन्ह त्यांनी चोरलं. त्या चिन्हावर लढण्याची हिंमत नाही. भाजपला त्यांना त्यांच्या चिन्हावर लढू देण्याचं धाडस नाही, असं ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया
आगामी लोकसभा निवडणुकीवरही संजय राऊतांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीची जागा वाटपाची जी चर्चा आहे, त्यावर चिमटा घेण्याची गरज नाही. आम्ही चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे. संपूर्ण देशात जागावाटप अत्यंत संयमाने सुरु असेल ते म्हणजे महाराष्ट्रात आम्ही लोकशाहीसाठी निवडणुकांमध्ये काम करत आहे. सर्वांसोबत चर्चा करुनच जागा वाटपाचा तिढा सोडवणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कोणी कुठे लढावं ह्यावर मी बोलणार नाही. नारायण राणेंबद्दल मी एवढेच सांगेल की ते बोलत होते की आम्हाला लढण्याची इच्छा नाही असे कसे होणार आणि कोणी लढले तरी विजय आमचाच होणार आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलंय.