साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले हे दिल्लीत गेले होते. भाजप मुख्यालयात भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले आणि जेपी नड्डा यांच्यात बैठक झाली. सातारा लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. उदयनराजेंना पाच पाच दिवस तुम्ही वेटिंगला ठेवता… सातारच्या छत्रपतींना वेटिंगला ठेवता याचा विचार उदयनराजेंनीच करायला हवा, असं संजय राऊत म्हणालेत.
महाविकास आघाडीने कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अत्यंत सन्मानाने आणि एक मताने उमेदवारी दिली. ती जागा खरं म्हणजे शिवसेनेची होती. तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते. तरी आम्ही सन्मानाने त्यांना ती जागा दिली. साताऱ्याची गादी ही छत्रपतींची गादी आहे. भाजपला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान जर अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल. मग ते उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील त्यांना सांगावं लागेल, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.
आज जरी शिमगा असला तरी निवडणूक आयोगाने शिमग्याची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये केल्या दीड वर्षापासून शिमगाच शिमगा आहे. प्रत्येक व्यासपीठावरून एकमेकांच्या विरोधात बोंबाच मारल्या जातात. त्यामुळे शिमग्याचं एकेकाळी जे महत्व होतं ते कमी झालं आहे. आता जनतेला रोज शिमगा पाहायला मिळतोय, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
सध्या राज्यात पक्ष फोडीचा, आरोप प्रत्यारोपांचा, चिखलफेकीचा, बेकायदेशीर अटकाव हा शिमगा सुरू आहे हा लवकरच संपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुढचा शिमगा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि धार्मिक साजरा करू याच आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रामध्ये शिमग्याला फार महत्त्व आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक अमंगल गोष्टींचा उदय झाला आहे. या महाराष्ट्रावरती संकट येत आहेत. ही सगळी संकट अमंगल प्रवृत्ती या वेळेला होळीत दहन करू… , असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संविधान वाचवणं काळाची देशाची राष्ट्राची नाहीतर जगाची गरज आहे. भारताचे संविधान जगासाठी आदर्श संविधान आहे. देशातील सध्याचे सरकार रोज उठून संविधानावर घाव घालत आहे. संविधान आज विकलांग झालेला दिसत आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केला आहे. या देशातील संविधानाला सर्वात मोठा धोका राज्यकर्त्यांपासून आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.