अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई | 26 डिसेंबर 2023 : शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलंय. त्यानंतर हा मतदारसंघ आणि आगामी लोकसभा निवडणूक याची राज्यात जोरदार चर्चा होतेय. अशातच अजित पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अमोल कोल्हेंना धोबीपछाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारी असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांनी काल बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे. अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकीत पाडणार असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार…. तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलं.
अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर अजित पवार नेमका कोणता उमेदवार कोल्हेंच्या विरोधात देणार याची चर्चा होत होती. आता मात्र सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तगडी लढत झाली होती. उद्धव ठाकरे यांचे निकडवर्तीय आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते तसंच जाणते राजकारणी अशी ओळख असलेल्या आढळराव पाटील यांना राजकारणात नवख्या असणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हरवलं होतं. आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी विजय खेचून आणला. आता जर आढळराव पाटील जर अजित पवार गटासोबत गेले. तर पुन्हा या दोघांमध्ये तगडी लढत होण्याची शक्यता आहे.