आमश्या पाडवींचं शिवसेनेत येणं हा केवळ ट्रेलर, आता रोज नवे धमाके होणार; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat on Aamshya Padavi and Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण शिवसेनेत येणार; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, आमश्या पाडवी यांचं शिवसेनेत येणं हा केवळ... संजय राऊतांवरही जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
मुंबई | 17 मार्च 2024 : देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होत आहे. अशात अनेक नेते आमच्या पक्षात प्रवेश करतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पाडवी यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आज ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यावर शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमश्या पाडवी हे आज शिवसेनेत येत आहेत. बुधवारपर्यंत रोज नवनवे धमाके होतच राहणार आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
आज शिवाजी पार्कवर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता सभा होत आहे. यात इंडिया आघाडीतील मित्रपक्ष उपस्थित राहणार आहेत. यावरही संजय शिरसाटांनी निशाणा साधला. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कात होत आहे. आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. तिथे बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं ऐकण्याची आम्हाला सवय आहे. त्यात काँग्रेसच्या मंचावर आज उद्धव ठाकरे बसणार आहेत. हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. काँग्रेस धोकादायक आहे, असं बाळासाहेब बोलायचे. आज उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात हे दुर्दैवी आहे. आज शिवसेना रडतेय असं वाटतं आहे. काँग्रेससोबत बसणं हे ठाकरे गटाचं पाप आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.
ठाकरेंना चॅलेंज, राऊतांवर निशाणा
खरंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाजवळ नेलं पाहिजे. तिथे त्यांना नतमस्तक करायला लावलं पाहिजे. हिंमत असेल तर ‘गर्व से कहों हम हिंदू है’ घोषणा… द्या, असं चॅलेंज शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये जातील. राहुल गांधींसोबत फक्त संजय राऊतचे फोटो लागतात. संजय राऊत यांची राजकीय महत्वकांक्षा वेगळी आहे. तुम्हाला नॅशनल राजकारणात कोण विचारतं का?, असा थेट सवाल संजय शिरसाटांनी केला आहे.
महायुतीचं जागावाटप कधी?
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशात राज्यातील जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर झालेला नाही. यावरही संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिलीय. आम्ही काही जागांची अदलाबदली करणार आहोत. महायुतीचा तिढा सुटला आहे. उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याइतकं प्रकरण गंभीर नाही. योग्य पद्धतीने जागा वाटप झालंय, असं शिरसाटांनी म्हटलं आहे.