मुंबई | 18 जानेवारी 2024 : तारीख होती 15 जानेवारी… सकाळी सकाळी बातमी येऊन धडकली. ठाकरे कुटुंबातचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर घातपात होण्याची शक्यता… त्यानंतर पोलीसही अलर्ट झाले. आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. या फोनला आता लव्हस्टोरीचा अँगल समोर आला आहे. मातोश्रीबाहेर घातपात होणार असल्याचा निनावी कॉल लव्ह ट्रॅंगलमधून आल्याचं समोर आलं आहे. जो नंबर अज्ञात आरोपीने पोलिसांना दिला होता. त्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण आलं आहे.
गुजरात ते मुंबई ट्रेनमधून चार ते पाच तरुणांचा ग्रुप मुंबईला येत असून ते मातोश्रीवर घातपात घडवणार आहेत, असा कॉल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. या कॉल करणाऱ्या व्यक्तीने एक फोन नंबर पोलिसांना दिला होता. पोलिसांनी त्या नंबर धारकाची चौकशी केली. चौकशीत अज्ञात व्यक्तीने पोलिसांना ज्या व्यक्तीचा नंबर दिला होता. त्याच्या प्रेयसीने नकार दिल्यानंतर रागाच्या भरात हा कॉल केल्याचं समोर आलं आहे. आता पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
15 जानेवारी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला. या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहात असलेल्या मातोश्रीबाहेर घातपात होणार असल्याची माहिती देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने मातोश्री बाहेर मोठा कांड होणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. येत्या 22 जानेवारीला राममंदिराचं उद्घाटन होणार आहे. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर घातपात होणार असल्याचा फोन आला. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली.
एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करत धक्कादायक माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधील संभाषण ऐकलं. या 4 ते 5 मुस्लिम व्यक्तींचे संभाषण ऐकलं, असं या व्यक्तीने सांगितलं. हे मुस्लिम तरुण उर्दू भाषेत संभाषण करत होते. हे तरुण मोहम्मद अली रोडवर रुम रेंटवर घेणार आहेत. लवकरच हे लोक ठाकरेंच्या घराबाहेर घातपात करणार असल्याचं या व्यक्तीने सांगितलं. मात्र आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे.