गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, वांद्रे- मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना पक्ष कुणाचा? याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. शिवाय उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अशातच ठिकठिकाणी अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. ठाकरे कुटुंबाचं मातोश्री हे निवासस्थान मुंबईतील वांद्रे भागात आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा होल्ड या भागात आहे. याच वांद्र्यात एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेत. बोरीवलीतही असेच बॅनर लागले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागत आहेत. मुंबईतील वांद्रे भागात शिंदेंचे अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या विभाग प्रमुखांना बॅनर लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. यानंतरच्या सर्व बनर्सवर एकनाथ शिंदे यांचा ‘शिवसेना पक्ष प्रमुख’ असा उल्लेख करा, असे आदेश पक्ष कार्यालयातून देण्यात आले आहेत, अशी माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांचा मोठा विजय… ‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना’ एकनाथ शिंदे साहेब हेच खरे वारसदार. अंतिम विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा… खऱ्या शिवसेनेचा…!, असा या बॅनरवर मजकूर आहे. हा बॅनर कुणाल सरमळकर यांनी लावला आहे.
दुसऱ्या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख आणि सामान्य जनतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला कायमस्वरूपी मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन, असं म्हणण्यात आलं आहे. बंटी महाडिक यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून बॅनर लावले जात आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर ‘एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना’ असे बॅनर पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून त्यांच्या स्वागतासाठी हा बॅनेर लावले गेले आहेत.