मुंबई : मुंबईतील (Mumbai Water issue) महत्त्वाच्या भागात आज आणि उद्या दोन दिवस पाणीबाणी जाणवणार आहे. कुर्ला, घाटकोपरसह लालबागमध्ये दोन दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होई.. महापालिकेकडून (BMC) केल्या जाणाऱ्या कामाच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे. विद्याविहार इथं सूक्ष्मबोगदा पद्धतीनं जलवाहिन्या वळवण्याचं पहिल्या टप्प्याचं काम हाती घेण्यात आलंय.18 आणि 19 मे रोजी हे काम केलं जातंय. त्यामुळे मुंबईतल्या बहुतांश भागातील पाणी पुरवठ्यावर (Mumbai Water supply News) परिणाम जाणवणार आहे. परिणामी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. काही ठिकाणी आज पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, असं पालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
मुंबईतल्या विद्याविहार, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, वडाळा, लालबाग, परळ या भागांतील लोकांना त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. आज सकाळी 10 वाजल्यापासून ते उद्या (19 मे) सकाळी 10 वाजेपर्यंत महापालिका मायक्रोटनलचं काम सुरु राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्या एल पूर्व, एन, एम पश्चिम, एफ उत्तर या वॉर्डमधील नागरिकांना पूर्णपणे पाणीबाणी जाणवेल. कारण या भागातील पाणीपुरवठा आज (18 मे) आणि उद्या (19 मे) मे दरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, एफ दक्षिण, दादारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नथा भातनकर मार्ग, बी जे देवरुखमार्ग, गोविंदजी केणी मार्ग- नायगाव हिंदमाता, दक्षिण परळ, लालबाग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जीतीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली इथं कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल, असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय.
दरम्यान, पाणी पुरवठा होणार नसल्याच्या कारणानं संबंधित भागातील नागरिकांना याबाबतची नोंद घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. तसंच पर्यायी पाणी साठा आधीच ठेवण्यासोबत पाणी जपून वापरण्याचंही आवाहन याआधीच करण्यात आलं होतं.