मुंबई – उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना (Mumbai) थोडासा दिलासा मिळाला. मुंबईसह उपनगरात पहाटे सहाच्या सुमारात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत काहीवेळ गारवा निर्माण झाला होता. पाऊस (Mumbai Rain) जरी झाला असला तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दादर, शिवडी, माटुंगा, परळ आणि नवी मुंबईसारख्या लगतच्या भागात पावसाने हजेरी लावली. चालूवर्षी पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (Weather department) दिले आहेत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी मान्सुनपूर्व सरी कोसळल्या आहेत. पाऊस लवकर सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांची हातघाई उसळली आहे.
सोमवारी रात्री मुंबईत कुलाबा परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, कुलाबा वेधशाळेनुसार, 3.4 मिमी पाऊस झाला आहे. तसेच पुढच्या आठवड्यात शहरात हलक्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तासात मुंबईत ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी किंवा रात्री हलक्या पद्धतीचा पाऊस होईल. हलक्या पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. सांताक्रूझ वेधशाळेत सकाळी सापेक्ष आर्द्रता 71 टक्के होती, तर कुलाब्यात 87 टक्के होती. पावसाळ्यात सापेक्ष आर्द्रता 90 आणि त्याहून अधिक असते.
पावसानंतर कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पेक्षा एक अंशाने कमी होते. आज सांताक्रूझ येथे तापमान 29.2 अंश सेल्सिअस होते. सात दिवसांच्या अंदाजानुसार, मुंबईत या आठवड्यात मोसमातील पहिल्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. आठवडाभर ढगाळ आभाळ अपेक्षित असताना, 28 आणि 29 मे रोजी पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सून 12 जून ते 15 जून या दरम्यान सक्रीय होईल.