मुंबईतील बिल्डर तणावाखाली
मुंबई : देशात छोटे आणि मोठे बिल्डर मिळून असे 11 हजार रजिस्टर्ड बिल्डर आहेत. यापैकी दोन हजार 500 बिल्डर हे फक्त मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात आहेत. या बिल्डर्सचं काम पूर्ण देशात पसरलेलं आहे. पण सध्या मुंबईचे बिल्डर तणावाखाली आहेत. तज्ञांच्या मते याचं कारण प्रलंबित असलेले प्रोजेक्ट आणि तयार असलेल्या फ्लॅटसाठी ग्राहकांचा तुटवडा आहे. सध्या […]
मुंबई : देशात छोटे आणि मोठे बिल्डर मिळून असे 11 हजार रजिस्टर्ड बिल्डर आहेत. यापैकी दोन हजार 500 बिल्डर हे फक्त मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात आहेत. या बिल्डर्सचं काम पूर्ण देशात पसरलेलं आहे. पण सध्या मुंबईचे बिल्डर तणावाखाली आहेत. तज्ञांच्या मते याचं कारण प्रलंबित असलेले प्रोजेक्ट आणि तयार असलेल्या फ्लॅटसाठी ग्राहकांचा तुटवडा आहे. सध्या परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की, बिल्डर हे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. नुकतचं चेंबूरमध्ये एक प्रोजेक्ट अडकल्याने एका बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना याचं जीवंत उदाहरण आहे.
संजोना डेव्हलपर्सचे मालक आणि नामवंत बिल्डर संजय अग्रवाल यांनी चेंबूरमधील स्वतःच्या ऑफिसमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चेंबूर मधील एक प्रोजेक्ट कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याने संजय अग्रवाल यांनी आत्महत्या केली.
तणावाखाली येऊन बिल्डरने आत्महत्या केल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधीही मुंबईच्या तीन बिल्डरांनी आत्महत्या केली. गेल्यावर्षी मार्चमध्ये आसिफ जोजवाला, 17 जानेवारी 2016 ला मोहन बिल्डर्सचे डायरेक्टर अमित भाटिया आणि ऑक्टोबर 2015 मध्ये ठाण्याचे बिल्डर सुरज परमार यांनी आत्महत्या केली होती. सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर राजकारणी, अधिकारी आणि आरटीआय अॅक्टिव्हिस्टची नावे समोर आली होती, जी त्यांचा प्रोजेक्ट अडकवून त्यांच्याकडून पैसे उकडणार होती.
रियल इस्टेट क्षेत्रात सध्या सुरू आहे मंदीची सावट!
मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात 1600 प्रोजेक्ट चालू आहेत, तर मुंबईच्या आजुबाजुच्या परिसरात म्हणजे एमएमआर रीजनमध्ये 4400 प्रोजेक्ट सुरु आहेत. मुंबईच्या बाहेर घरे थोडी स्वस्त असल्यामुळे मुंबईतील प्रोजेक्टला ग्राहक नाहीत. याचे कारण म्हणजे नोटाबंदीमुळे ब्लॅकमनी कमी झाला, रेराचे कठोर नियम आणि अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट्सवर 12 टक्के जीएसटी. यामुळे खरेदी करणारा मुंबईतून हद्दपार होत आहे. कारण मुंबईमध्ये फ्लॅटच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत.
बिल्डरांवर आता चहू बाजुंनी दबाव आहे, निवडणुकाजवळ येत आहे. त्यामुळे नेत्यांनी प्रोजेक्टमध्ये गुंतवलेले पैसेही अनेकांना परत द्यावे लागतील, बँकांचे व्याज देणे आहे, नवीन कर्ज मिळत नाही. मुंबईमध्ये कुठल्या प्रोजेक्टवर कधी कुठली गदा येईल सांगता येत नाही. यामुळे त्रस्त असलेले बिल्डर आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. देशभरात 12 लाख 50 हजार कोटींची उलाढाल असलेल्या या रिअल इस्टेटच्या व्यवसायाची सध्या पूर्ण देशात वाईट अवस्था आहे. म्हणूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल अनेक बिल्डर उचलत आहेत.