मुंबई : देशभरात ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन खाटांनी सुसज्ज असे जंबो कोविड सेंटर लवकर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. चुनाभट्टी येथील सोमय्या ट्रस्टच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या या कोविड सेंटरच्या कामाचा आढावा खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला. म्हाडा च्या वतीने उभारण्यात आलेले हे सेंटर येत्या 15 दिवसांत सुरू होणार असून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा खासदार शेवाळे यांनी व्यक्त केली. या पाहणी दौऱ्यात खासदार शेवाळे यांच्यासह नगरसेवक रामदास कांबळे, डीन डॉ. सुजाता पोळ, अतिरिक्त डीन डॉ. रविकिरण गोळे, कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत धात्रक, पालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. नामदेव तळपे, सोमय्या ट्रस्ट चे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन चुनाभट्टी येथील सोमय्या ट्रस्टच्या सुमारे 18 हजार स्क्वेअर मीटर जागेत म्हाडाच्या वतीने हे जंबो कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्वच्या सर्व 1200 खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा असून याठिकाणी अतिदक्षता विभाग आणि लहान मुलांसाठीही विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सायन – चुनाभटटी जंबो कोविड सेंटरची भूमिका फार महत्त्वाची ठरू शकेल. पूर्णपणे ऑक्सिजन युक्त खाटा उपलब्ध असलेला आणि ऑक्सिजनचा अखंड पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था असलेल्या या सेंटरमुळे पूर्व उपनगरातील नागरिकांना कोरोना संकटात मोठा दिलासा मिळू शकेल, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली.
– सुमारे 18 हजार स्क्वेअर मीटर जागेत एकूण 8 युनिट
– म्हाडा च्या वतीने सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून सेंटर उभारण्यात आले.
– 1024 खाटा ऑक्सीजन पुरवठा युक्त
– अतिदक्षता विभागात एकूण 210 खाटा
– लहान मुलांसाठी ऑक्सिजन आणि अतिदक्षता मिळून सुमारे 250 खाटा उपलब्ध
– याच ठिकाणी सुमारे 40 किलो लिटर क्षमतेचा लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन प्लांट
– अखंड ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन जनारेटींग प्लांट
– आपत्कालीन वापरासाठी प्रत्येकी 10 लिटर चे 300 ऑक्सिजन सिलेंडर तैनात
इतर बातम्या-