तर देशात पहिली भुयारी रेल्वे मुंबईत धावली असती ! काय होती महत्वाकांक्षी योजना

देशाच्या आर्थिक राजधानीत भुयारी रेल्वे मार्गाचे काम अजूनही सुरु आहे. कुलाबा-बीकेसी-सिप्झ या 33.5 किमी भुयारी रेल्वेचे काम कोरोना काळ आणि आरे कारशेडच्या वादामुळे प्रचंड रखडले आहे. देशात 1984 मध्ये कोलकाता शहरात पहीली भुयारी मेट्रो धावली होती. परंतू त्याच्या आधीच मुंबईत साठच्या दशकात भुयारी रेल्वे चालविण्याची योजना आखण्यात आली होती. या योजनेला मूर्तस्वरुप का आले नाही ? काय अडचणी आल्या ते पाहूयात

तर देशात पहिली भुयारी रेल्वे मुंबईत धावली असती ! काय होती महत्वाकांक्षी योजना
An underground railway would have run in Mumbai in the sixtiesImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 2:19 PM

मुंबईच्या पोटातून जाणाऱ्या कुलाबा – बीकेसी – सिप्झ मेट्रो या 33.5 किमी भुयारी मेट्रोचे काम अजून सुरु आहे. मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रोचा पहिला बीकेसी ते आरे असा टप्पा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. परंतू तुम्हाला हे माहीती आहे का ? मुंबईत साठच्या दशकात अंडरग्राऊंड लोकल चालविण्याची योजना होती. या योजनेचे काम एका मराठी माणसाच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते. ही योजना जर राबविली गेली असती तर कोलकाताच्याआधी मुंबईत साठच्या दशकातच अंडरग्राऊंड ट्रेन धावली असती. काय होती ही योजना ? ही योजना तडीस का गेली नाही ? चला पाहुयात…

‘रिंग रुट अंडरग्राऊंड’ रेल्वे मार्ग

मुंबईकरांना अविरत सेवा देणाऱ्या बेस्टला येत्या 9 मे 2024 रोजी दीडशे वर्षे पूर्ण होणार आहेत. बेस्टचा इतिहास बेस्टच्या आणिक आगारातील बेस्टच्या संग्रहालयात जतन करुन ठेवला आहे. या म्युझियमचे क्युरेटर अंबादास गर्जे यांनी माहीती देताना सांगितले की बेस्टचे तत्कालिन उपमहाव्यवस्थापक डॉ. प्रभाकर गणेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अंडरग्राऊंड लोकल ट्रेन चालविण्याच्या महत्वांकाक्षी योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले होते. बेस्टचे उपमहाव्यवस्थापक प्रभाकर पाटणकर यांनी 1956 मध्ये जपान दौरा केला. टोकियो आणि ओसाका शहरांना त्यांनी भेट दिली. मुंबईत भुयारी रेल्वे सुरु करण्यासाठी जपान येथील टुस्कीची टीम मुंबईत आली होती. त्यांनी सहा आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण केले. दोन टप्प्यात आणि सहा वर्षांत भूयारी रेल्वेची योजना राबविण्यात येणार होती अशी माहीती अंबादास गर्जे यांनी दिली.

Best Museum Curator Ambadas Garje

Best Museum Curator Ambadas Garje

15 नवे पैसे अंडरग्राऊड रेल्वेचे तिकीट

दोन टप्प्यात अंडरग्राऊंड रेल्वेची योजना राबविण्यात येणार होती. काळा घोडा येथील छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम चर्चगेट मार्गे ते मुंबई सेंट्रल असा साडे सहा किमीचा पहिला टप्पा तर म्युझियम ते बेलार्ड पिअर मार्गे मुंबई सेंट्रल असा साडे सहा किमीचा दुसरा टप्पा असा रिंगरुट रेल्वे प्रकल्प उभारण्याची योजना होती. हा मार्ग मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडला जाणार होता. या मार्गावर किमान तिकीट 15 नवे पैसे ठेवण्यात आले होते. तर नंतर खर्च वाढून किमान तिकीट 50 पैसे ठरविण्यात आले. सुरुवातीला पहिल्या टप्प्याचा खर्च 16.5 कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्याचा खर्च 12.54 कोटी रुपये होता. 1954 रोजी सर्वप्रथम ही योजना आखण्यात आली होती. या योजनेसाठी 100 कोटी रुपयांचा खर्च येणार होता. परंतू हा खर्च जास्त असल्याचे सरकारचे म्हणणे होते. त्यामुळे पुन्हा 1957 ला सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी 64 कोटी रुपयांवर खर्च आणण्यात आला. या मार्गासाठी बेस्टची जागतिक बॅंकेकडून कर्ज घेण्याची योजना होती. प्रकल्पाला लागणारा कालावधी आणि जादा खर्च त्यातच बेस्टला नवीन वाहने खरेदी करायची असल्याने हा प्रकल्पाला मंजुरी मिळण्यास उशीर झाला. नंतर 1972 ला दुष्काळ पडला. बेस्टचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प मागे पडल्याचे म्युझियमचे क्युरेटर अंबादास गर्जे यांनी सांगितले.

दुमजली बोगदे आणि स्थानके

मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रोचे काम टनेल बोअरिंग मशिन ( टीबीएम ) द्वारे सुरु झाले होते. परंतू साठच्या दशकात मुंबईत ‘कट अॅण्ड कव्हर’ पद्धतीने अंडरग्राऊंड लोकल ट्रेनचे काम होणार होते. या अंडर ग्राऊंड रेल्वेचा मार्गाचा डीपीआर तयार करण्याची जबाबदारी बेस्टचे तत्कालिन उपमहाव्यवस्थापक प्रभाकर गणेश पाटणकर यांच्यावर सोपविली होती. त्यानंतर जपानवरुन आलेल्या तज्ज्ञांनी मुंबईतील रस्त्यांवरील नियोजित मार्गावर खड्डे खणून मातीचे परिक्षण केले होते. या भुयारी रेल्वेसाठी बेस्टच पालिकेची हमी देऊन कर्ज काढून कर्जाचे हप्ते भरणार होती. या योजनेसाठी 185 ट्रेन खरेदी करण्याची योजना होती. या प्रकल्पाला बेस्ट वीज पुरविणार होती. तेरा स्थानके पहिल्या टप्प्यात तयार होणार होती. प्रिन्सेस स्ट्रीट ते गिरगाव चर्चगेट मार्गावर जागा कमी कमी असल्याने एकावर एक असा दुमजली मार्ग बोगदा आणि दुमजली स्थानके तयार करण्याची योजना होती.

Mumbai BEST Deputy GM Prabahkar Patankar

Mumbai BEST Deputy GM Prabahkar Patankar

कोण होते प्रभाकर पाटणकर ?

प्रभाकर पाटणकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसनमध्ये झाले. ते बी.ई. ( सिव्हील ) झाले. त्यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ अर्बन मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम इन इंडिया’ विषयात मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली. त्यांनी तेव्हाच्या जीआयपी म्हणजे ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेत ( मध्य रेल्वे ) सहायक अभियंता नोकरी केली. त्यानंतर बेस्टमध्ये विविध पदावर काम करीत ते उपमहाव्यवस्थापक झाले. नंतर एसटीमध्ये ही काही काळ व्यवस्थापक होते. त्यांनी जगभरातील वाहतूक यंत्रणेचा अभ्यास केला होता. मुंबईत भुयारी रेल्वे चालवावी अशी मागणी त्यांनी 1963 सालापासून लावून धरली होती. बेस्टमध्ये असताना त्यांनी भुयारी रेल्वेची योजना आखली परंतू ती तडीस गेली नाही.

बेस्टच्या म्युझियममध्ये काय ?

बेस्टला मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेननंतर मुंबईची सेंकड लाईफ लाईन मानले जाते. मुंबईकरांच्या सेवेसाठी तीन ते साडे तीन हजार बसेस रस्त्यावर धावत असतात. सध्या मुंबईत दररोज 35 लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. प्रवासात बेस्टच्या बस गाड्यात अनेक प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू विसरुन जातात. या वस्तूंचे जतन बेस्टच्या वडाळा येथील आगारात केले जाते. तेथे ओळख पटवून प्रवाशांच्या वस्तू त्यांना परत केल्या जातात. ज्या वस्तू प्रवासी परत घेण्यास आले नाहीत. अशा वस्तूंपैकी परदेशी पर्यटकांनी बेस्टमध्ये विसरलेली पुरातन नाणी आणि नोटांना बेस्टने आपल्या संग्रहालयात जतन करुन ठेवले आहे. सायन- प्रतिक्षानगरातील आणिक आगार येथील बेस्टच्या संग्रहालयात पुरातन नाणी, नोटा आणि बेस्टचा इतिहासच जतन करुन ठेवला आहे. या बेस्टच्या अनोख्या संग्रहालयात 80 हून अधिक देशांची नाणी आणि 60 हून अधिक देशांच्या नोटा आहेत. आणखी बऱ्याच गोष्टी या संग्रहालयात जतन करुन ठेवल्या आहेत.

Best Museum Curator Yatin Pimpale

Best Museum Curator Yatin Pimpale

शालेय विद्यार्थ्यांचे आकर्षण

आम्ही बेस्टच्या संग्रहालयात देशांच्या वर्गवारीनुसार त्यांची नाणी लहान आकर्षक गिफ्ट ट्रेमध्ये रचून ठेवली आहेत. तर करन्सी नोट या भिंतीवर डिस्प्ले बोर्डवर ठेवल्या आहेत. त्यामुळे या म्युझियमला भेट देणाऱ्यांच्या त्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. विशेषत: शालेय विद्यार्थी या विदेशी नाण्यांना आणि नोटांना पाहून हरखून जातात असे या म्युझियम क्युरेटर यतीन एस. पिंपळे यांनी सांगितले. या म्युझियममध्ये तुर्की, व्हेनेझुएला, येमेन, टांझानिया, स्वीडन, रोमानिया, कतार आदी अनेक देशांची नाणी आहेत. वडाळा हा मध्यवर्ती विभाग असल्याने बेस्टचे प्रवासी विसरलेल्या वस्तू तेथील बेस्टच्या आगारात जपून ठेवल्या जातात. मुंबईत दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. या प्रवाशांनी बसमध्ये किंवा बसस्थानक परिसरात विसरलेल्या गहाळ वस्तूंपैकी जुन्या नाण्यांचा येथे संग्रह केला आहे. अनेक वर्षे या नाण्यांना आणि नोटांना घेण्यासाठी कोणी पुढे आलेले नाही. त्यातील बरीच नाणी कालबाह्य झालेली आहेत. त्यामुळे ही नाणी आणि नोटा आता म्युझियमकडे आली आहेत असे म्युझियमचे क्युरेटर यतिन पिंपळे सांगतात.

Mumbai BEST Journey

Mumbai BEST Journey

घोड्यांची ट्राम, इलेक्ट्रीक ट्राम ते डिझेल बस

मुंबईत 9 मे 1874 मध्ये घोड्याच्या सहाय्याने धावणारी पहीली ट्राम गाडी सुरु झाली होती. तर वीजेचा शोध लागल्यानंतर सिंगल डेकर इलेक्ट्रीक ट्राम 1907 मध्ये सुरु झाली. तर 1920 मध्ये डबल डेकर इलेक्ट्रीक ट्राम धावायला लागली. आता आपण प्रदुषण कमी करणाऱ्या इलेक्ट्रीक बसचे कौतूक करतो, परंतू मुंबईत 1907 मध्ये प्रदुषण मुक्त इलेक्ट्रीक ट्राम धावायला लागली होती असे यतिन पिंपळे यांनी सांगितले. मुंबईत 15 जुलै 1926 रोजी सिंगल डेकर डीझेलवरील बस सुरु झाली. त्यानंतर 1937 मध्ये डबल डेकर बस सुरु झाली. 31 मार्च 1964 मध्ये रस्त्यावरील वाहने वाढल्याने ट्राम सेवा काळाच्या ओघात बंद केली गेली. मुंबईत जवळपास 90 वर्षे ट्राम सेवा सुरु होती. आता ट्राम सेवा बंद होऊन 60 वर्षे झाली आहेत. देशात आता केवळ कोलकाता येथे ट्राम सेवा सुरु आहे. दादर टी.टी. तसेच परळ टीटी ही ठिकाणे ट्राम टर्मिनल्स होती म्हणून त्यास विभागाला अशी नावे पडली. बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेडची स्थापना 1873 मध्ये औपचारिकरीत्या झाली. मुंबई पालिकेने तिच्याशी करार केला. यानंतर बॉम्बे ट्रामवे कायदा, 1874 लागू झाला, ज्या अंतर्गत कंपनीला ट्रामवे चालवण्याचा परवाना देण्यात आला नंतर तिचे नाव बॉम्बे इलेक्ट्रीसिटी सप्लाय अॅंड ट्रान्सपोर्ट ( बेस्ट ) असे झाले.

डबल डेकर संग्रहालयात येणार

आणिक आगारमधील बेस्टचे हे म्युझियम साल 1983 रोजी स्थापन केले गेले. मुंबई महानगर पालिकेच्या बृहन्मुंबईची विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाचे जुनी वीजेची मीटर, जुन्या काळातील बेस्टची तिकीटे, तिकीट देणारी मशिन, बस आणि ओव्हरहेड वायरद्वारे चालणारी ट्राम आणि इलेक्ट्रीक बस आदीचे मिनीएचर वर्कींग मॉडेल, अनेक जुन्या काळातील छायाचित्रे येथे जतन करुन ठेवली आहेत. बेस्टचे हे संग्रहालय आधी कुर्ला डेपो येथे होते. परंतू तेथे जागेची टंचाई जाणवू लागल्याने नव्वदच्या दशकात ते आणिक आगारात शिफ्ट करण्यात आले. हे संग्रहालय दक्षिण मुंबईतील भायखळा येथील राणीच्या बागेजवळ हलविण्याची योजना होती. परंतू प्राणी संग्रहालयाजवळ वस्तू संग्रहालय उभारण्यास मनाई करण्यात आल्याने ही योजना मागे पडल्याचे म्हटले जाते. येथे आता बेस्टने नुकत्याच सेवेतून निरोप दिलेल्या डीझेलवर डबल डेकर बसचे मॉडेल आणले जाणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.