अनधिकृत पार्किंग करणाऱ्या 241 वाहनांवर पालिकेची कारवाई
पालिकेने 27 वाहनतळांच्या लगत 500 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर रविवारी 7 जुलैपासून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत आलेल्या वाहनांकडून 8 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे
मुंबई : मुंबईची वाहतूक सुरळीत व्हावी या दृष्टीने पालिकेने अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार पालिकेने 27 वाहनतळांच्या लगत 500 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर रविवारी 7 जुलैपासून धडक कारवाई केली आहे. यानुसार गेल्या 3 दिवसात 243 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून कारवाई करण्यात आलेल्या वाहनांकडून 8 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर आणि रस्त्यांजवळ अनधिकृत ‘पार्किंग’ होत असते. हे लक्षात घेता पालिकेने ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहन चालकांना तब्बल 10 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार निर्णयाची अमंलबजावणी रविवारी 7 जुलैपासून करण्यात आली.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवार 7 जुलैपासून काल मंगळवारी 9 जुलैपर्यंत 243 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांकडून पालिकेने 8 लाख 69 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. या कारवाईत 243 वाहनांमध्ये 133 चारचाकी, 101 दुचाकी, 9 तीन चाकी वाहनांचा समावेश आहे.
पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रातील 27 वाहनतळांलगतच्या 500 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई केली आहे. या रकमेत कारवाई दरम्यान उचलण्यात आलेल्या वाहनासाठी लावण्यात आलेला दंड व विलंब आकाराचा समावेश आहे. ही रक्कम विभागातील विकास कामांसाठी खर्च केली जाणार आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर आणि रस्त्यांजवळ अनधिकृत ‘पार्किंग’ होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहनांची गती मंदावत आहे, असे मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने ‘पार्क’ करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे विविध 146 ठिकाणी तब्बल 34 हजार 808 वाहने ‘पार्क’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरीही अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी पार्किंगजवळील एक किलोमीटरच्या रस्ता, तसेच दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले होते.