“माय नेम इज जान…”, गौहर जान यांचे ग्लॅमरस आयुष्य आणि विलक्षण संगीत नाटकाचा अविस्मरणीय अनुभव
पहिल्यांदाच मुंबईतील वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी पडलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी अभिनेते अनुपम खेर, टीव्ही ९ नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.
My Name Is Jaan Drama Gauhar Jaan Life Show : भारतातील पहिले वहिले गाणे रेकॉर्ड करणाऱ्या प्रख्यात गायिका गौहर जान यांचे आयुष्य जितकं ग्लॅमरस होतं, तितकाच त्यांचा प्रवास खडतर होता. त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक चढउतार, आव्हान आणि पदरी पडलेले यश हा सर्व प्रवास अनुभवणं ही एक विलक्षण पर्वणी आहे. आपल्या हरहुन्नरी प्रतिभेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गौहर खान यांचे आयुष्य उलगडणारे एकपात्री संगीत नाटकाचा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. ‘माय नेम इज जान’ असे या एकपात्री संगीत नाटकाचे नाव होते. प्रसिद्ध अभिनेत्री अर्पिता चॅटर्जी यांनी यात प्रमुख भूमिका साकारली होती. पहिल्यांदाच मुंबईतील वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी पडलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी अभिनेते अनुपम खेर, टीव्ही ९ नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.
‘माय नेम इज जान’ नाटकाबद्दल…
प्रख्यात गायिका गौहर जान या भारतातील पहिल्या करोडपती गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. २६ जून १८७३ रोजी जन्म झालेल्या गौहर खान यांचे बालपण संघर्षमय होते. गौहर खान या लहान असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर गौहर खान या बनारसला गेल्या, त्यांनी तिथे संगीत आणि नृत्य उस्तादाकडून प्रशिक्षण घेतले. यानंतर १८८३ मध्ये त्या कोलकातामध्ये आल्या आणि त्यांचे नाव बदलून मलका जान असे केले.
गौहर जान या फक्त शाही दरबार, राजे, महाराज यांच्या दरबारातच गाणी गायच्या. गौहर खान यांची गाणी ऐकणे हे सर्वसामान्यांसाठी स्वप्नवतच होते. यासाठीच ग्रामोफोन कंपनीने त्यांची गाणे रेकॉर्ड केली आणि त्यांचा आवाज कैद करुन ठेवला. गौहर खान या त्यांच्या गाण्यामुळे प्रसिद्धच्या वेगळ्या शिखरावर पोहोचल्या. पण खऱ्या आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत मात्र त्या कमनशिबीच ठरल्या. गौहर खान यांचा सिनेसृष्टीत प्रचंड दबदबा होता. गौहर खान यांचे बालपण जसे खडतर होते, तसेच त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवसही एकाकीपणाचे ठरले. गौहर खान यांचा संपूर्ण प्रवास हा ‘माय नेम इज जान’ या नाटकातून उलगडण्यात आला आहे.
संगीत नाटकातील जमेच्या बाजू
प्रसिद्ध अभिनेत्री अर्पिता चॅटर्जी यांनी फारच उत्तम पद्धतीने गौहर खान यांची भूमिका साकारली आहे. ‘माय नेम इज जान’ हे एकपात्री नाटक असले तरी ते पाहताना असं कुठेही जाणवत नाही. नाटकाची सुरुवात फारच रंजक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यांचा अभिनय आणि गायन यांनी या नाटकाला चार चाँद लावले आहेत. रंगमंचाचा पडदा उघडल्यानंतर एक छोटा स्टेज, चार वांजत्री आणि एकट्या अर्पिता चॅटर्जी यांनी खुर्चीवर बसलेल्या सर्वांच्याच नजरा स्वत:कडे खिळवून ठेवल्या. अर्पिता यांनी अभिनय आणि गायनकौशल्यातून केवळ गौहर जान यांच्या आयुष्याचं कथनच केले नाही, तर त्यांनी रसिकांसमोर एका अष्टपैलू कलाकाराचं आयुष्यही उलगडले. काही सेकंद तर आपण खरोखरच गौहर जान यांना पाहतोय की काय, असा आभासही होतो. त्यामुळे गौहर खान यांचे आयुष्य उलगडणारा आणि तल्लीन करणारा हा अनुभव नाट्यरसिकांनी नक्कीच अनुभवायला हवा.
अनुपम खेर काय म्हणाले?
या नाटकाला प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर उपस्थित होते. ‘माय नेम इज जान’ हे नाटक पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “हे नाटक परफेक्ट होतं. डिझाईन, संगीत, अभिनय आणि इतर सर्वच बाबी या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर करण्यात आल्या. खूपच प्रोफेशनल पद्धतीने हे एकपात्री संगीत नाटक सादर करण्यात आले. मी खूप काळानंतर असा सुंदर एखादे नाटक पाहिले. या नाटकातील सर्वच गोष्टी मनाला भिडल्या. अर्पिता ही खरोखरच एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. तिने गौहर खान यांची सादर केलेली प्रत्येक छटा, त्यांचे संगीत, नृत्य यातून त्यांचे अभिनय कौशल्य पाहायला मिळाले. मला इथे येऊन खरोखरच खूप आनंद झाला”, अशा शब्दात अनुपम खेर यांनी भावना व्यक्त केल्या.
“खरोखरच प्रेक्षकांसाठी पर्वणी”
यावेळी नाटकाचे लेखक, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. “अनुपमजी तुम्ही म्हणालात की मला समोर बसल्याने खूपच अवघडल्यासारखे होत होते. पण मी हे सर्व पाहताना मी या सर्व गोष्टीत कुठेतरी बसतो का? असा प्रश्न मला पडला होता. आम्ही बिझनेस करतो. प्रॉफिट लॉस या गोष्टी पाहतो. पण जेव्हा मी कधी अशा कार्यक्रमांना येतो, तेव्हा मला खरंच असे वाटते की आपण समाजातील काही गोष्टीत कमी हातभार लावत आहोत. मी या नाटकाचा पहिल्या दिवसांपासूनच भाग आहे. मी कित्येकदा दिग्दर्शकाला स्क्रिप्टमधील बदलही सूचवले आहेत. पण मला असे वाटते की या सर्व गोष्टीत अर्पिता चॅटर्जीचे योगदान खरोखरच उल्लेखनीय आहे. फक्त अर्पिता नाही, तर या नाटकाच्या दिग्दर्शकापासून ते ब्रॅक ग्राऊंड आर्टिस्ट सर्वांनीच फार मेहनत घेतली आहे. हे नाटक पाहणं हे खरोखरच प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे”, अशा शब्दात नाटकाचे लेखक, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी भावना व्यक्त केल्या.