मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये काँग्रेसचं सरकार येईल अशी आशा व्यक्त केलीय. काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो असं नाना पटोले म्हणाले. देशाची जी परिस्थिती आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर लोकशाही धोक्यात असेल तर सगळ्यांना मतभेद बाजूला ठेऊन एक आलं पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. आज देशात जी सत्ता आहे ती देशाला बर्बाद करेल, असं देखील नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याकडे काहीच न्हवतं. जेव्हा पहिला बजेट आलं ते केवळ 350 कोटींचं होतं. सगळ्या गोष्टींचा अभाव होता. काँग्रेसने आम्हाला काही नाही दिलं असं नवीन पिढीला वाटतं. काँग्रेसने सगळ्या सुविधा दिल्यावर नवीन पिढीला वाटलं की नवीन, सरकार काहीतरी वेगळं करेल, असं नाना पटोले म्हणाले.
जे देश विकून देश चालवतात ते मोठे नाहीत. आजपर्यंत 26 सार्वजनिक उपक्रम विकून देश विकायच काम ते करत आहेत. गरीब आणि मध्यम वर्गाची कोरोना काळात कशी परिस्थिती झाली हे आपण पाहिलं आहे. देशाला ज्या काँग्रेसने बनवलं त्याला काँग्रेस वाचवत आहे, देश विकणाऱ्यांपासून काँग्रेस वाचवत आहेत, असं नाना पटोले म्हणाले. 136 दिवसांसाठी 5 राज्यांच्या निवडणुका चालल्या मात्र तेव्हा डिझेल, एलपीजीचे भाव नाही वाढले आणि निवडणुकीनंतर दरवाढ सुरु झाली, असं नाना पटोले म्हणाले.
भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जाती धर्मामध्ये फुट पाडून राज्य करण्याची आहे. मागील 8 वर्षात या पद्धतीचे राजकारण जोरात सुरु आहे. या देशात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात असताना त्याला छेद देण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून गेले जात आहे. देशाची संपत्ती विकून देश चालवला जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील 36 उद्योग नरेंद्र मोदी सरकारने विकून टाकले. देश उद्ध्वस्थ करण्याचे काम सुरु आहे. देशाला या विचारधारेपासून वाचवण्याची गरज आहे.
काश्मीर फाईल्स चित्रपट आला आहे त्यामध्ये जितकं खोटं दाखवता आलं तितकं दाखवलं गेलं आहे. चित्रपट बनवणाऱ्याने पैसे कमावले आणि आज देशाचे प्रधानमंत्री सिनेमाचा आनंद घेत आहेत. मोदी सरकारविरोधात आगामी काळात उठणारा आवाज हा महाराष्ट्रामधून असेल आणि तो पुढे देशभरात पोहोचेल, असं नाना पटोले म्हणाले.
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, डिजीटल सदस्य नोंदणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इमरान प्रतापगडी, प्रभारी अहमद खान, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री अनिस अहमद, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एम. एम. शेख, इब्राहीम भाईजान, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्यासह अल्पसंख्यक विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.