मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कायम चर्चेत असलेले पाहायला मिळतात. साधी राहणीमान आणि अभ्यासू नेते म्हणूनही झिरवाळ ओळखले जातात. आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर झिरवाळ आणि त्यांच्या धर्मपत्नीचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो विमानतळावरील आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही या फोटोवर कमेंट करताना मातीशी नाळ असणारा नेता अशा अनेक उपाधी देत कौतुक केलं आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखा तर्फे 11 ते 23 एप्रिल या कालावधीत जपान या देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याला नरहरी झिरवाळ आपल्या पत्नीसह गेले आहेत. या फोटोमध्ये झिरवाळ यांनी परदेशी जातानाही आपलं ग्रामीण भागातील ‘गावपण’ जपलेलं दिसून आलं. त्यांनी जाण्याआधी विमानतळावरील फोटो ट्विट केला आहे.
आज राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखा तर्फे ११ ते २३ एप्रिल या कालावधीत जपान या देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे, या दौऱ्याच्या निमित्ताने जपान येथे रवाना होताना .@NCPspeaks
#CPA #japan pic.twitter.com/IiwWgnFAup— Narhari Zirwal (@Narhari_Zirwal) April 11, 2023
आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधीत्व करणारे झिरवाळ अथक संघर्षातून पुढे आले आहेत. नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख आहे.
जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले आणि वनारे गावचे सरपंचही झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2001 साली ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीचं राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं आणि ते विजयी झाले.
सलग तिसऱ्यांदा आमदार
विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत झिरवळ यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भरुन काढला. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 12 हजार 633 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिरवळ यांनी 60 हजार 813 च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह झिरवळ यांनी सलग दोनवेळा दिंडोरी मतदार संघातून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळवला.