उगवत नाही, फुलत नाही, वास येत नाही, असा चाफा फक्त इथंच, नारायण राणे पुन्हा बरसले
पण, असाही चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि वास येत नाही.
समीर भिसे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत आज प्रसाद लाड यांनी स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, विरोधक वेदांताबद्दल बरेच बोलतात. आमचे आशिष शेलार कवी आहेत. बोलता बोलता ते म्हणाले, चाफा बोलेना, चाफा उगवेना. पण, असाही चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि वास येत नाही. असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे. बाकी कुठं नाही. त्या माणसाला अडीच वर्षे मिळाली. महाराष्ट्र कसा सहन करत होता, मला कळतं नाही. असा टोला राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
काही येत नाही. 39 वर्षे जवळून पाहिलं त्या माणसाला. काही येत नाही. केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत एका डिबेटमध्ये आले. पत्रकारांनी एक प्रश्न विचारला. बजेटमध्ये एक महसुली, राजकोषीय तुट आहे. ती वाढत चालली आहे.तेव्हा मला काही यातलं कळतं नाही. अरे पण, त्या केंद्राच्या आहेत. तू राज्याचा मुख्यमंत्री आहेस. मग, झालास का मुख्यमंत्री, अशी टीकाही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
दरडोई उत्पन्न वाढीसाठी काय केलं
मला त्यांनी उत्तर द्यावं. अडीच वर्षात तुम्ही कोणती योजना राबविली. गरिबांचं दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी काय केलं. मुंबईत निरक्षरतेचं प्रमाण 18 टक्के आहे. दारिद्रे रेषेखालचं प्रमाण 31 टक्के आहे. दरडोई उत्पन्न दोन लाख 84 आहे. गोव्याचं दरडोई उत्पन्न पाच लाखांच्या जवळ आहे. उत्तरेकडच्या एका राज्याचं साडेचार लाख आहे. काही राज्यांचं साडेतीन लाख आहे. आपलं दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी यांनी काय केलं, असा सवालही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
साहेबांच्या नखाची सर नाही
आता रोज फक्त शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका करतात. अरे तू होतास तेव्हा काय केलं ते सांग ना बाबा. साहेब साहेब होते. साहेबांच्या नखाची सर नाही हो या माणसाला. बाळासाहेब आग होते. या माणसाला कोळसा नाही म्हणू शकत, अशी टीकाही राणे यांनी ठाकरे यांच्यावर केली.
200 कोटींच ट्रेनिंग सेंटर देतो
नारायण राणे म्हणाले, 200 कोटींच ट्रेनिंग सेंटर मुंबईत सुरू करता येईल. मी ते द्यायला तयार आहे. जगातलं मुख्य मार्केट मुंबईत आहे. जगातील उद्योजक येत असतात. आयात कमी करून निर्यात वाढवा. उद्योजक बनविण्याची फॅक्टरी भाजपकडं आहे.माझाही माश्यांच्या उद्योग आहे. जपानला निर्यात करतो. मी नुसताच बोलत नाही.