Narayan Rane : मुख्यमंत्र्यांचं नाचता येईना अंगण वाकडे, भोग्यांवरून केंद्राकडे बोट दाखवल्यानंतर नारायण राणे आक्रमक
बाळासाहेबांच्या गुणांचे मुल्यमापन कुणी करू नये, ते कर्तृत्ववान होते. त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली, भोळे म्हणून नाही, त्यांना माणूसकी होती, कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस याद्वारे त्यांनी वर्चस्व निर्माण केलं, साहेबांनी कमावले काहींना ते टिकवता आलं नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर (Cm Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.
मुंबई : शिवसेना आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातलं राजकीय प्रेम सर्वांनीचं पाहिलं आहे. एकिकडून शिवसेना राणेंवर वेळोवेळी टीकेचे बाण सोडत असते. तर तिकडून राणेही प्रहार करण्याचे सोडत नाही. आज महाराष्ट्र दिनी नारायण राणेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आठवण काढत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तर त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेला कोपरखिळ्या मारल्या आहेत. महाराष्ट्राने जी प्रगती केली, त्यातील 34% वाटा मुंबईचा आहे. तर राज्यातील नागरिकांनी उद्योगाच्या माध्यमातून प्रगती करावी. बाळासाहेबांच्या गुणांचे मुल्यमापन कुणी करू नये, ते कर्तृत्ववान होते. त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली, भोळे म्हणून नाही, त्यांना माणूसकी होती, कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस याद्वारे त्यांनी वर्चस्व निर्माण केलं, साहेबांनी कमावले काहींना ते टिकवता आलं नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर (Cm Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.
नाचता येईना अंगण वाकडे
त्यांना साहेबांचं मूल्यमापन करण्याची नैतिकता नाही, मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्र दिनी लोकांना देण्यासारखं बोला, गरिबी, निरीक्षितता, दरडोई उत्पन्न यावर बोलावं. जमेल ते करावं, राजकारण जमत नाही, मुख्यमंत्री पदावर शोभतही नाही आणि जमतही नाही, अशी खरपूस टीका राणे यांनी केली आहे. तसेच आज 10 वर्षे मागे नेण्याचं काम केलं आहे, असेही ते म्हणाले. तर मुख्यमंत्री यांना सांगा भोंगे काढावेत, केंद्राने का धोरण ठरवावे? नाचत येईना अंगण वाकडे, काहीतरी कर्तृत्व दाखवा. बाबरी मस्जिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, एक टक्का तरी उद्धव ठाकरे यांचे योगदान आहे का, एक कानफटात मारणे, एक दिवस जेलमध्ये तरी गेले आहेत का हे कधी केलं आहे का, आयत्या बिळावर नागोबा, शरद पवारांच्या आशीर्वादाने तेवढे बस, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
मुख्यमंत्री म्हणून राज्याला फायदा नाही
तसेच मंत्रालयात न येता 5 वर्ष कसे पूर्ण करणार, काही मुलींच्या हत्या करून आत्महत्या केल्याचं जाहीर करतात, तिच्या घराच्या बाहेर मंत्र्यांच्या गफ्या लागतात. तरीही काही केलं नाही. तुमच्या डोळ्याला कोणी विचारात नाही, हुंगत बसा, मुख्यमंत्री म्हणून तुमचा महाराष्ट्राला काही फायदा नाही, असे म्हणत राणे यांनी आजही चौफेर बॅटिंग केली आहे. मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातून बाहेर न पडण्यावर या आधीही सडकून टीका झाली आहे. कोरोना आणि शस्त्रक्रियेमुळे बरेच दिवस मुख्यमंत्री बाहेर पडत नव्हते. ते घरूनच राज्याच्या राजकारणाचा गाडा हाक होते. मात्र आता मुख्यमंत्री बाहेर पडत धडाडीने कामाला लागले आहेत. मात्र भाजप नेत्यांकडून आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.