भाजपच्या सांगण्यावरुन मी पक्ष काढला, आता निवडणुका लढवणार: नारायण राणे
मुंबई: “माझ्या पक्षाचा जन्म त्यांच्या (भाजप) सांगण्यावरुनच झाला आहे. मात्र शिवसेना आणि भाजपच्या युतीने दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही. मी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करुन, निवडणुका लढवणार” अशी घोषणा खासदार नारायण राणे यांनी केली. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा लढवणार. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा राज्यभर जागा […]
मुंबई: “माझ्या पक्षाचा जन्म त्यांच्या (भाजप) सांगण्यावरुनच झाला आहे. मात्र शिवसेना आणि भाजपच्या युतीने दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही. मी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करुन, निवडणुका लढवणार” अशी घोषणा खासदार नारायण राणे यांनी केली. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा लढवणार. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा राज्यभर जागा लढवणार असं नारायण राणे म्हणाले.
शिवसेना-भाजप युतीने जाहीर केल्यानंतर भाजपचे सहयोगी खासदार असलेल्या नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
“मला भाजपने खासदार केलं. मात्र कमिटमेंट पूर्ण झाल्या नाहीत. मग मी स्वबळावर लढावं नाहीतर काय करावं? मी भाजपचं काम करत घरी बसावं?” असा सवाल उपस्थित करत नारायण राणे पुढे म्हणाले, “माझ्या पक्षाचा जन्म त्यांच्या सांगण्यावरुनच झालाय.”
देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मुंबई महानगरापालिकेत आहे, त्यामुळे ते पचवण्यासाठी सत्तेत हवं, म्हणून युती झाली, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
उद्धव ठाकरे आणि मन साफ हे समीकरण जमत नाही. जनहिताच्या नावाखाली शिवसेना-भाजप एकत्र आले, मात्र त्यांनी चार वर्षात काय केलं? 15 लाख दिले का, रोजगार दिला का, टक्केवारीवर चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना, असा घणाघात नारायण राणे यांनी केला. मुंबईतील मराठीचा टक्का कमी झाला यासाठी शिवसेनाच सर्वस्वी जबाबदार आहे, असं राणे म्हणाले.
संजय राऊत किती बोलत होते, आता काय झालं? संजय राऊतांनी फजिती करुन घेतली. खिशात राजीनामे घेऊन फिरतात, शिवसेना बोलेल तसा वागेल, असा पक्ष नाही, असं राणे म्हणाले.
महाआघाडीत जाण्याचा माझा विचार नाही. एखाद्या पक्षाच्या नेत्याला मदत केली म्हणून त्याच्या पक्षात जाणं असं होतं नाही. सुनील तटकरेंना मदत केली म्हणून मी राष्ट्रवादीत गेलो असं होत नाही, असं स्पष्टीकरण राणेंनी दिलं.
भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार का, असे विचारले असताना नारायण राणे म्हणाले, “राजीनामा का द्यावा? मी भाजपचा सदस्य नाहीय. भाजपचं सदस्यत्व आहे का माझ्याकडे? मी माझ्या पक्षाचं जाहीरनामा जाहीर करणार. आम्ही वेगळं लढतोय, आम्हाला याच्यातून वगळा, असं कळवणार. तसं पत्रही भाजपला पाठवणार.”
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
• शिवसेना-भाजप ही युती फायद्याची होणार नाही – नारायण राणे • शिवसेना-भाजप युती झाल्याचं काल कुठेही उत्साह दिसला नाही, केवळ नेत्यांच्या समाधानासाठी युती झाली – नारायण राणे • मला भाजपने खासदार केलं. मात्र कमिटमेंट पूर्ण झाल्या नाहीत. मग मी स्वबळावर लढावं नाहीतर काय करावं? मी भाजपचं काम करत घरी बसाव? – नारायण राणे • राजीनामा का द्यावा? मी भाजपचा सदस्य नाहीय. भाजपचं सदस्यत्व आहे का माझ्याकडे? – नारायण राणे • मी माझ्या पक्षाचं जाहीरनामा जाहीर करणार. आम्ही वेगळं लढतोय, आम्हाला याच्यातून वगळा, असं कळवणार. तसं पत्रही भाजपला पाठवणार – नारायण राणे • देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मुंबई महानगरापालिकेत, त्यामुळे ते पचवण्यासाठी सत्तेत हवं म्हणून युती झाली – नारायण राणे • तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, असं युतीचं आहे – नारायण राणे • माझ्या पक्षाचा जन्म त्यांच्या (भाजप) सांगण्यावरुन झाला – नारायण राणे • सत्तेत असूनही उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी काही करु शकले नाहीत, सेना जनतेसाठी काहीच करु शकत नाही – नारायण राणे • महाआघाडीत जाण्याचा माझा विचार नाही – नारायण राणे • खिशात राजीनामे घेऊन फिरतात, शिवसेना बोलेल तसा वागेल, असा पक्ष नाही – नारायण राणे • संजय राऊत किती बोलत होते, आता काय झालं? संजय राऊतांनी फजिती करुन घेतली – नारायण राणे • मुंबईत मराठी लोकांची टक्केवारी कमी होण्यास शिवसेना जबाबदार आहे – नारायण राणे