महाविद्यालय कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीतानं, शिवजयंतीपासून अंमलबजावणी
महाविद्यालय कामकाजाची सुरुवात आता राष्ट्रगीताने होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः याची घोषणा केली
पुणे : महाविद्यालय कामकाजाची सुरुवात आता राष्ट्रगीताने होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः याची घोषणा केली (National Anthem compulsion to colleges). शिवजयंतीपासून (19 फेब्रुवारी) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रात रोज किमान 15 लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं राष्ट्रगीत म्हणणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. उदय सामंत यांनी पुण्यात शैक्षणिक संस्थांच्या अडचणी आणि धोरणात्मक निर्णया संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, “इंजिनिअरिंग पदवी आणि डिप्लोमा जागा भरल्या जात नाही. 50 ते 52 टक्के जागा रिक्त असतात. त्यामुळं 5 तज्ज्ञांची समिती स्थापन करून ऑनलाईन प्रवेश दिला जाईन. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठांच्या समस्यांसंदर्भात पुन्हा सचिवांबरोबर बैठक घेण्यात येईन. दर 3 महिन्यांनी पुण्यात शिक्षण संस्थांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. महाविद्यालय परिसर तंबाखुमुक्त, स्मोक, अल्कोहोल आणि व्यसनमुक्त करण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. वेळ प्रसंगी त्यासाठी कडक कायदाही करण्यात येईल.
महाविद्यालयात मुलींच्या सुरक्षे संदर्भात माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहे. यातून 3 महिन्यात मुलींच्या सुरक्षेचा पॅटर्न पुढे आणणार आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी नमूद केलं. ते म्हणाले, “महाविद्यालयात मुलींच्या सुरक्षे संदर्भात माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहे. 3 महिन्यात मुलींच्या सुरक्षेचा पॅटर्न पुढे आणणार आहे. या समितीत उपसभापती नीलम गोऱ्हेंसह इतर कार्यकर्त्या आणि अधिकारी असतील. 3 महिन्यात यावर निर्णय घेतला जाईल. प्रत्येक महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये छेडछाड होऊ नये यासाठी दक्षता घेण्याबाबत मुलांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.”
महाविद्यालयात वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलन केली जातात. मात्र, सर्व संघटनांना सारखा नियम असावा. परवानगी देण्यात पक्षपातीपणा होऊ नये. कायदा सुव्यवस्था अबाधित राहून निर्णय घेतला गेला पाहिजे, असंही सामंत यांनी नमूद केलं. मात्र, केंद्राच्या निर्णयाबाबत कॉलेज कॅम्पसमध्ये प्रचार अथवा प्रबोधन करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जनतेला ठरवू द्या, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. हे जनतेच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे सरकार लोकांच्या मनात काय आहे तेच करणार असल्याचे सामंत यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या सीईटी फॉर्म चुकल्यास त्यांना पुन्हा पैसे मिळणार आहेत. तसेच पुण्यात टीचर अकादमीसाठी निधी मंजूर केला असून त्याचं काम पुढील 2 महिन्यात काम सुरु होईल, अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली.
National Anthem compulsion to colleges