दाऊदच्या साम्राज्याला NCB चा आणखी एक धक्का, ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड भुजवाला अटकेत
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करत नुकतंच एनसीबीने भुजावालाच्या घरावर धाड टाकली होती. (NCB Drug Factory Arif Bhujwala)
मुंबई : मुंबईतील ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवाला याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बेड्या ठोकल्या आहेत. भुजवाला हा दाऊद गँग आणि दुबईतील ड्रग्ज नेटवर्कच्या थेट संपर्कात होता. एनसीबीने केलेल्या छापेमारीपासून भुजवाला फरार होता. अखेर त्याला रायगडमधून अटक करण्यात आली. भुजवालाला प्रति दाऊद असंही म्हटलं जातं. (NCB arrested Mumbai Drug Factory Mastermind Arif Bhujwala)
खिडकीतून उडी मारुन भुजवाला पसार
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करत नुकतंच एनसीबीने भुजावालाच्या घरावर धाड टाकली होती. भुजवाला मुंबईतील डोंगरी भागात ड्रग्जची फॅक्टरी चालवत होता. छापेमारीसाठी एनसीबी भुजवालाच्या घरी पोहोचली, तेव्हा तो खिडकीतून उडी मारुन पसार झाला.
भुजवालाचं जाळं परदेशापर्यंत
एनसीबीच्या हातावर तुरी देऊन भुजवाला पसार झाला, मात्र ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा 12 प्रकारचा कच्चा माल, कोट्यवधी रुपयांची रोकड आणि हत्यारं जप्त करण्यात आली होती. भुजवालाने आपलं जाळं फक्त मुंबईतच नव्हे, तर परदेशापर्यंत पसरवलं होतं.
अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाणला एनसीबीने गजाआड केलं आहे. पठाणच्या चौकशीत आरिफ भुजवाला आणि त्याच्या ड्रग्ज फॅक्टरीची माहिती समोर आली. त्यानंतर दाऊदच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या भुजावालाला पकडण्याची योजना एनसीबीने आखली होती.
समीर वानखेडेंची कारवाई
एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांनीच “डी” कंपनीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. दाऊदच्या डोंगरीत घुसून त्यांनी कारवाई केली होती. इतकंच नाही, तर दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्याही आवळल्या होत्या. समीर वानखेडे यांनी डोंगरीतील ड्रग्जची फॅक्ट्री उद्ध्वस्त केली. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (NCB arrested Mumbai Drug Factory Mastermind Arif Bhujwala)
करण सजनानी ड्रग्ज कनेक्शनमध्ये समीर खान गजाआड
करण सजनानी ड्रग कनेक्शनमध्ये समीर खान यांचं नाव समोर आलं होतं. त्यानुसार आम्ही त्यांना चौकशीला बोलवलं आणि यात त्याची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक केली आहे. याच प्रकरणात वांद्रेमधून एका व्यक्तीला एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती वानखेडेंनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
“समीर खान आणि करण सजनानी यांच्यात किरकोळ रकमेचे व्यवहार झाले नसून ते मोठे आहेत. शिवाय समीर खानने ड्रग्स सेवन केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याआधारे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीय,” असंही समीर वानखेडे यांनी नमूद केलं होतं.
संबंधित बातम्या :
दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ
(NCB arrested Mumbai Drug Factory Mastermind Arif Bhujwala)