मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण या शपथविधीच्या दोन दिवस आधीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला होता. विशेष म्हणजे अजित पवार यांनी शपथविधीआधी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांनी मिळून अशा एकूण 40 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अजित पवार यांनी शपथविधीच्या आधी आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनी पूर्ण पक्षावरच दावा केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
अजित पवार यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदार आणि खासदारांनी मिळून ठराव तयार केला. या ठरावात अजित पवार यांचा दावा योग्य असल्याचं म्हटलं आहे. हा ठराव देखील याचिकेसोबत जोडण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे अजित पवार यांनी आज आमदारांची बैठक बोलावली होती. त्यांच्या आजच्या बैठकीला विधानसभेचे 32 आमदार उपस्थित होते. या सर्व आमदारांना आता एकत्र ठेवण्यात आलं आहे.
अजित पवार यांच्याकडून 30 जूनला एक याचिका तयार करण्यात आली होती. ही याचिका केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज निवडणूक आयोगाला मिळाली आहे. 40 सदस्यांचा पाठिंबा असल्याचं या याचिकेत स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाला एक वेगळा ई-मेलही मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा मेल पाठवला आहे. या मेलमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, प्रकरण सध्या वादग्रस्त आहे. कुठलाही एकपक्षीय आदेश जारी केला जाणार नाही. अपात्रतेची कारवाई आमच्याकडून सुरु करण्यात आली आहे. आपण दोन्ही बाजूची भूमिका ऐकून निर्णय घ्यावा, असं मेलमध्ये म्हटल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद आता निवडणूक आयोगात येऊन पोहोचला आहे. दोन्ही गटाकडून आता पक्षाच्या चिन्ह आणि नावावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग दोन्ही बाजूची भूमिका ऐकून घेऊन निर्णय देईल. जवळपास तीन महिने सुनावणी सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.