आधी चंद्रकांत पाटील यांचा बंगला, नंतर अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
अजित पवार गटाच्या गोटात हालचालींना वेग आलाय. आगामी लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभा निवडणूक, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाई या सर्व मुद्द्यांवर रणनीती ठरवणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे अजित पवार गट कामाला लागला आहे.
मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. केंद्र सरकारने संसदेचं चार दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे देशभरात विविध चर्चांना उधाण आलंय. या अधिवेशनात ‘एक देश, एक निवडणूक’ हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक मान्य झालं तर देशभरात डिसेंबर महिन्यात निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशा चर्चांना उधाण आलंय. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांची एकमोट बांधली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत.
विशेष म्हणजे मुंबईत आज सत्ताधारी पक्षांच्या गोटात जबरदस्त हालचाली घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप या तीनही पक्षांच्या समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला तीनही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांच्या गटात महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत.
अजित पवार यांच्या निवासस्थानी खलबतं
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई येथील निवासस्थानी महायुतीची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठकीत नेमकी चर्चा काय?
मतदारसंघांवरील पकड आणखी घट्ट करण्यासाठी अजित पवार गटाने नवी रणनीती ठरवल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाच्या आमदारांची आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी मुंबईत बैठक पार पडणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आजच्या बैठकीला आमदार अदिती तटकरे, रामराजे निंबाळकर, मंत्री छगन भूजबळ, किरण लम्हाटे, निलेश लंके, अनिकेत तटकरे, संजय बनसोडे, आणि इतर आमदारल उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदारांसाठी देवगिरी बंगल्यावर स्नेह भोजनाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.
अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक महत्त्वाची आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगात अजित पवार यांच्या गटाचे सर्व दावे फेटाळले आहेत. तर अजित पवार यांच्या गटाच्या आमदांना अपात्र करण्यात यावं, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार गटात या विषयावर खलबतं झाल्याची शक्यता आहे.