मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने ते आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहू शकले नाहीत. विशेष म्हणजे ते या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला देखील गेले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. असं असताना आता महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिंदे-फडणवीस आज अचानक दिल्लीला वरिष्ठांच्या भेटीसाठी गेले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर खलबतं होत आहेत. अजित पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या गटाच्या मंत्र्यांनी महत्त्वाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारणात काहीतरी मोठं घडणार तर नाही ना? अशा चर्चांना उधाण आलंय.
मंत्री छगन भुजबळ आज संध्याकाळी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या आजरपणाबाबत प्रतिक्रिया दिली. “अजित दादांना थ्रोट इंफेक्शन झालंय. त्यामुळे ते कॅबिनेटला आले नाहीत. तरीसुद्धा आमची बैठक आहे, ती होणार आहे. बैठक अगोदरच ठरलेली होती. कॅबिनेटला अजितदादा येणार नाहीत हे मला सांगितलं होतं. आता प्रफुल्ल पटेल या बैठकीचं नेतृत्त्व करतील. थ्रोट इंफेक्शनमुळे ते देवगिरीतून मंत्रालयापर्यंतही येऊ शकले नाहीत. हे राजकीय आजारपण नाही. दादांना कधी राजकीय आजारपण होऊच शकत नाही”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
कॅबिनेट सारख्या बैठकीला अजित पवार कधी गैरहजेरी लावत नाहीत. मात्र ते आज बैठकीला आलेच नाहीत. कॅबिनेटच्या बैठकीनंतर तडकाफडकी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना झाले. इथंही अजित पवार सोबत आलेच नाहीत. दिल्लीत 7 तारखेला होणाऱ्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीलाही दादा जाणार नसल्याचं कळतंय
विशेष म्हणजे दादा कॅबिनेटच्या बैठकीला आले नाहीत. दिल्लीलाही शिंदे फडणवीसांच्या सोबत गेले नाहीत. मात्र देवगिरी बंगल्यावर त्यांनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. आता ही बैठक अचानक कशासाठी? यावरुनीही चर्चा आहे. अजित पवारांची नाराजी आणि कॅबिनेटच्या गैरहजेरीवर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिलीय. अजित पवारांची तब्येत ठीक नाही, वेगळा अर्थ काढू नका, असं शिंदे म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांतली अजित दादांची गैरहजेरी चर्चेचा विषय आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत आले होते. त्या दौऱ्यात शिंदे, फडणवीस सोबत होते. पण अजित पवार नव्हते. फडणवीसांच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी अजित पवार आले. पण शिंदेंच्या घरी आले नाहीत.
कॅबिनेटच्या बैठकीलाही अजित पवार आले नाहीत, आजारपणाचं कारण देण्यात आलंय. शिंदे, फडणवीस दिल्ली दौऱ्याला गेलेत पण त्यांच्यासोबत अजित पवार गेले नाहीत. 7 तारखेच्या दिल्लीतल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीलाही अजित पवार जाणार नाही आहेत, नियोजित कार्यक्रमांचं कारण देण्यात आलंय.
कॅबिनेटच्या बैठकीआधी अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे मंत्री छगन भुजबळांनीच, त्यांच्या गटाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर भुजबळ उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटले. आता बैठकीत नेमकं काय झालं? आणि भुजबळांनी फडणवीसांना काय सांगितलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अजित पवार यांची पालकमंत्रिपदावरुन नाराजी असल्याचं समोर येतंय. पुणे, रायगड आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर अजित पवारांनी दावा ठोकलाय. मात्र या तिन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यास भाजप आणि शिंदे गटाचा विरोध आहे.
महाविकास आघाडीत अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तेव्हाही अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या अधून मधून येतच होत्या. आता 3 महिन्यातच, शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्येही अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या येत आहेत. अर्थात, दिल्लीत शिंदे-फडणवीस तडकाफडकी का गेले? यावरुनही सस्पेंस आहे.