Ajit Pawar : महायुतीपेक्षा अजितदादांचा सूर का वेगळा? योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ विधानावर हल्ला तर बारामतीमधील प्रचारात का नको मित्रांचा गोतावळा?
Ajit Pawar Mahayuti Strategy : महायुतीत अजितदादांच्या सूर बदलल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तर त्यातच निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणं बदलू शकतात, असा दावा अजितदादांच्या जवळच्या शिलेदाराने केला आहे. या दाव्या-प्रतिदाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.
राज्यात प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर भाजपाने त्यांचा फायरब्रँड नेता राज्याच्या राजकारणात उतरवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भात कटेंगे तो बटेंगे असा हुकमी एक्का टाकल्यानंतर राज्यातील वातावरण आता ढवळून निघाले आहे.विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आज येथे येत आहेत. धुळे शहरातील गोशाळा मैदानावर ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळा सूर आळवला आहे. महायुतीत अजितदादांच्या सूर बदलल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तर त्यातच निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणं बदलू शकतात, असा दावा अजितदादांच्या जवळच्या शिलेदाराने केला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.
बाहेरचे लोक येऊन असे विधान करतात
भाजपचे फायरब्रँड योगी आदित्यनाथ बुधवारी राज्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी बटेंगे तो कटेंगे असे विधान केले होते. त्यावर अजितदादांनी थेट निशाणा साधला. राज्याबाहेरची काही लोक असे विधान करतात. तर राज्यातील लोक सौहार्द जपण्यावर जोर देतात. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालतो, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
नवाब मलिकांचा प्रचार
भाजपने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तरीही अजितदादांनी नवाब मलिक यांना तिकीट दिले. मानखूर्दमधून मलिक तर त्यांची कन्या सना या अणुशक्तीनगर येथून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपची नाराजी असतानाही अजितदादांनी त्यांना तिकीट दिले आणि त्यांच्या प्रचारात सुद्धा उतरले. दरम्यान नवाब मलिक यांनी निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणं बदलू शकतात, असे संकेत दिले आहेत.
बारामती नको मित्रांचा गोतावळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते महायुतीच्या प्रचाराचा नारळ धुळे येथून फोडतील. त्यामुळे आता राज्यातील वातावरण तापणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. त्यानुसार, बारामतीत त्यांना कोणाच्याच रॅली, सभेची गरज नसल्याचे समोर आले आहे. उलट इतर विधानसभा मतदारसंघात पीएम मोदी यांच्या सभांची गरज असल्याचे ते म्हणाले.