मुंबई: पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर विधानसभेत विरोधकांनी अनिल देशमुख यांच्यावर तोंडसुख घेतलं, त्यांना बदनामा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायदेवता ही जिवंत आहे. अनिल देशमुख यांच्याबाबत विरोधकांचा वाईट मनुसबा असला तरी अखेर सत्य हे समोर आलेच, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना CBI च्या प्राथमिक तपासात क्लिनचिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला.
यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या अधिवेशनात अनिल देशमुख यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल झाला. त्यानंतर अनिल देशमुख हे प्रत्येक चौकशीला धाडसाने सामोरे गेले. आज ते या सगळ्यातून तावुनसुलाखून बाहेर पडले आहेत. विरोधकांनी 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणावरुन महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर सत्य समोर आलेच आहे, असे मिटकरी यांनी म्हटले.
तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, कोणत्याही तक्रारीच्या अनुषंगाने एखाद्या नेत्याची चौकशी झाली तर प्रत्येकवेळी तपासयंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी राजकीय हेतूने कोणती कृती केली तर न्यायव्यवस्था त्यांना फटकारते, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
सीबीआयचे उपअधिक्षक आर एस गुंजाळ यांनी चौकशी अहवाल सादर केलाय. या अहवालात देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे. अनिल देशमुख यांची आतापर्यंत प्राथमिक चौकशी झालीय, प्राथमिक चौकशीअंती त्यांच्याविरोधात एकही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधातले आरोप सिद्ध होत नाही. त्यांच्याविरोधातली चौकशी थांबविण्यात यावी तसंच पुढची कारवाई देखील थांबवावी, असंही सीबीआयच्या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. मात्र, सीबीआय किंवा अनिल देशमुख यांच्याकडून या बातमीला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.
अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स 25 जून रोजी देऊन 26 जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ 26 जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कालचं (18 ऑगस्ट) हे पाचव समन्स होत.16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.