बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात रात्रभरात काय- काय घडलं? सध्याचे अपडेट्स काय?
Baba Siddique Death Updates : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात रात्रभरात अनेक घडामोडी घडल्या. काल रात्रीपासून या प्रकरणात नेमकं काय- काय घडलं? बाबा सिद्दिकी यांच्या पोस्ट मार्टमबाबतची माहिती काय? बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स, वाचा सविस्तर....
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर 9 MM पिस्तूलने गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्याच्या निमित्त फटाके वाजवण्यात येत होते. याचवेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. 6 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. राजकीय वैमनस्यातून हत्येची सुपारी दिली गेली होती का? एसआरए प्रकल्पवरून असलेल्या वादातून ही हत्या झाली आहे का? की बिश्नोई गँगचा या प्रकरणात काही हात आहे? या तीन अँगलने पोलीस तपास करत आहेत.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात काय काय घडलं?
बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.15 ते 9.20 च्या सुमारास हल्ला झाला. रात्री 11. 30 च्या सुमारास बाबा सिद्दिकी यांना डॉक्टरांना मृत घोषित केलं. रात्री 1. 30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लीलावती रूग्णालयात जाऊन झिशान सिद्दिकी आणि सिद्दिकी कुटुंबियांची भेट घेतली. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं शूटिंग सुरु होतं. मात्र ते ते सोडून बॉलिवूड अभिनेता सलमान खान तातडीने लीलावती रूग्णालयात दाखल झाला. त्यानेही 2. 30 मिनिटांनी लीलावती रूग्णालयात जाऊन सिद्दिकी कुटुंबियांची भेट घेतली.
आरोपींची कसून चौकशी
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी करनैल सिंह आणि धर्मराज कश्यपची पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली. देवेन भारती आणि दया नायक यांचं रात्रीपासूनच तपासावर विशेष लक्ष आहे. पहाटे साडे पाच वाजता बाबा सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीतील कूपर रूग्णालयात आणला गेला. आठ वाजता बाबा सिद्दिकी यांचं शवविच्छेदन तेलं जाणार आहे. यावेळी व्हीडिओग्राफीदेखील केली जाणार आहे. सकाळी दहा वाजता आरोपींचं मेडिकल चेकअप करून त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, नेते बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर बांद्रा परिसरात भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. काल रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली गेली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक हल्लेखोर अद्याप फरार आहे. पकडलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे.