बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अजित पवारांकडून सर्वात मोठी अपडेट, म्हणाले पोलिसांना अंदाज…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अजित पवार यांनी बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकी यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Baba Siddique Shot Dead Ajit Pawar Meet : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. या घटनेनंतर सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावर कूपर रुग्णालयात शवविच्छेदन सुरु आहे. नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अजित पवार यांनी बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकी यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अजित पवारांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. यानंतर अजित पवार हे पहाटेच पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईत दाखल होताच अजित पवारांनी कूपर रुग्णालयात झिशान सिद्दीकी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नेमकी घटना काय झाली, याबद्दल झिशान सिद्दीकीकडे विचारपूस केली. यानंतर अजित पवारांनी कूपर रुग्णालयाबाहेर येत प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास कसा सुरु आहे, पोलिसांनी काय अपडेट दिली, बाबा सिद्दींकीवर कुठे अंत्यसंस्कार केले जाणार याबद्दल सविस्तर माहिती दिली. “बाबा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. आम्ही सर्व सहकारी जीशान आणि त्यांच्या कुटुंबीयासोबत आहोत”, असे अजित पवार म्हणाले.
आम्ही अतिशय शोकाकूल अवस्थेत आहोत
“बाबा हे सर्वांशी मिळून मिसळून राहायचे. मधल्या काळात ते राष्ट्रवादीत आले. ते आमचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रात फिरणार होते. आमच्या चर्चा झाल्या होत्या. पण काल त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. आम्ही त्याचा निषेध करत आहोत. पोलीस तपास करत आहेत. पाच ठिकाणी पोलिसांचे पथक गेले आहे. या घटनेने आम्ही अतिशय शोकाकूल अवस्थेत आहोत. अर्ध्या पाऊण तासात पोस्टमार्टेम होईल. पार्थिव त्यांच्या घरी जाईल. तिथे काही तास ठेवून लोकांच्या दर्शनासाठी ठेवलं जाईल. नंतर ८ वाजता बडा कब्रस्तानमध्ये मरीन लाईनला दफन होईल. शासकीय इतमानाने अंत्यसंस्कार होईल”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
“अत्यंत कमी वयाचा सहकारी गेला”
“अशा घटना घडल्यावर राजकारण केलं जातं हे दुर्देव आहे. त्यातून माझ्यासारख्याने काही निर्णयाप्रत येणं योग्य नाही. पोलिसांना काही अंदाज आलाय. पोलीस म्हणतात काही वेळ द्या. दोघांना अटक केली आहे. गृहमंत्री बारकाईने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. राजकारण करण्याच्या ठिकाणी करू. पण आपल्यातील अत्यंत कमी वयाचा सहकारी गेला. सर्वांच्यात मिळून मिसळून असणारा नेता होता. त्यांच्या इफ्तार पार्ट्यांना सर्व यायचे. बाबा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. आम्ही सर्व सहकारी जीशान आणि त्यांच्या कुटुंबीयासोबत आहोत. मी डीनशी बोललो. अर्ध्या तासात शवविच्छेदन होईल”, असेही अजित पवार म्हणाले.