मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात 20 जुलै 2022 या तारखेला मोठा भूकंप घडून आला होता. कारण राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात उभी फूट पाडली होती. त्यांनी पक्षाच्या तब्बल 40 आमदारांना घेऊन बंड पुकारलं होतं. सरकारमधील जवळपास 50 आमदार त्यांच्यासोबत होते. हे सर्व आमदार आधी सुरत त्यानंतर तिथून गुवाहाटीला गेले होते. जवळपास महिनाभर हे सत्तानाट्य रंगलं होतं. या दरम्यान राज्यात सत्तांतर घडून आलं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत नवं सरकार अस्तित्वात आणलं. या सगळ्या नाट्याला 20 जुलैपासून सुरुवात झाली होती. त्यामुळे येत्या 20 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपला डिवचण्यासाठी निषेध आंदोलन केलं जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या 20 जूनला या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल. या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे”, अशी माहिती ट्विटरवर देण्यात आलीय.
“खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या. खोके सरकारचा निषेध व्यक्त करा”, असा आदेश जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचं संबंधित पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के; राष्ट्रवादी काँग्रेस खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध करणार
प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांचे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन
महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात…
— NCP (@NCPspeaks) June 17, 2023
“शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करा. शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा, अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा, असे प्रदेशाध्यक्षांनी सूचित केले आहे”, अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलीय.