उदय सामंत आणि शरद पवार यांची भेट, बारसू रिफायनरीवर शरद पवार यांनी दिला महत्त्वाचा सल्ला; तिढा सुटणार?
मुख्यमंत्रीपदाच्या हालचालीची मला माहीत नाही. मुख्यमंत्री बदलण्याबाबत सत्ताधारी आम्हाला कशाला सांगतील? संजय राऊत पत्रकारही आहेत. त्यांना माहिती असू शकते. माझ्याकडे अशी कोणतीही माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले.
मुंबई : बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. ठाकरे गटानेही स्थानिकांच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं असून सरकराच्या अडचणीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणावर मार्ग निघावा म्हणून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी या प्रश्नी सरकारने स्थानिकांचे प्रश्न समजून घ्यावेत. त्यावर तोडगा काढावा. चर्चेतून तोडगा निघाला नाही तर या चर्चेत जे मुद्दे आले त्यावरून आपण काही पर्याय काढू, असा सल्ला शरद पवार यांनी सामंत यांना दिला आहे. सामंत यांनी हा सल्ला मान्य केल्याचं पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.
विरोधक आणि अधिकाऱ्यांची बैठक घ्या अशी सूचना उदय सामंत यांना केली.उद्याच्या उद्या शासनाचे प्रतिनिधी आणि आंदोलकांचे प्रतिनिधी बसून चर्चा करतील. या बैठकीतील निष्कर्ष सरकारला देऊ, असं सामंत म्हणाले. या निष्कर्षानंतर आणखी काही प्रश्न असेल आणि काही पर्याय असेल तर त्यावर चर्चा करू, असं मी सूचवलं. माझं हे मत त्यांनी मान्य केलं, असं शरद पवार म्हणाले. रिफायनरीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं ही शेवटची स्टेप असते. ती स्टेज आलेली नाही. त्यावर चर्चाही झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
बारसूला जाणार नाही
मी स्थानिकांशी बोललो नाही. एखादा प्रकल्प राज्यात कोणी करत असेल, प्रकल्प महत्त्वाचा असेल तर लोकांना विश्वासात घ्या. त्यांचा विरोध काय आहे हे समजून त्यातून मार्ग काढा, असा सल्ला मी दिला आहे. तर बारसूत आता फक्त जमिनीची मोजणी सुरू असं सामंत यांनी सांगितलं. आंदोलकांची तीव्र नाराजी असल्याचं मला मीडियातून समजलं. कोकणात नवीन काही होत असेल आणि स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे, असं ते म्हणाले. मी बारसूला जाणार नाही. पण माझ्या पक्षाचे काही सहकारी तिथे जात आहे. काही गेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पर्याय काढू
मार्ग काढण्यासाठी लोकांच्या शंकांचं समाधान करण्यासाठी काही तरी प्रयत्न केले पाहिजे. उद्याच्या बैठकीत काय होते ते पाहू. मार्ग निघाला तर आनंद आहे. नाही निघाला तर काही पर्याय काढता येईल, असं ते म्हणाले. आम्ही कुणाची जमीन काही घेतली नाही. फक्त सॉईल टेस्टिंग करत होतो. तेही काम थांबलं आहे, असं उदय सामंत यांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली.
मी काय सांगणार?
केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याबाबत पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, शाहांच्या दौऱ्याचं मी काय सांगणार? असा सवाल त्यांनी केला. शाह यांना महाराष्ट्रात येण्याबाबतचं मी बंधन घालू शकत नाही. ते येणार. त्यांच्या दौऱ्याबाबत त्यांच्या पक्षांनी ठरवावं, असं ते म्हणाले.