Sharad Pawar Meets CM Uddhav Thackeray: शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले, दीड तास चर्चा; पण चर्चा कशावर?
Sharad Pawar Meets CM Uddhav Thackeray: येत्या 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या भेटीतील चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादची सभा, भोंग्यांचा मुद्दा, राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि नवनीत राणा यांना झालेली अटक आदी मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचं कळतं. पवार यांनी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा केल्याने त्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या चर्चेवेळी केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोनच नेते उपस्थित असल्याचं सांगितलं जातं. राज्यातील विकास प्रकल्पांवरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
आज संध्याकाळी साडे चारच्या सुमारास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आले होते. दोन्ही नेत्यांनी राज्यातील कायद्या सुव्यवस्थेसह राज्यातील परिस्थिती आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. तब्बल दीड तास ही चर्चा झाली. या चर्चेचा संपूर्ण तपशील समजू शकला नाही. मात्र, भोंग्याच्या प्रकरणावर या बैठकीत सखोल चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.
राज ठाकरेंची सभा
येत्या 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्यांनी 3 तारखेपर्यंत भोंगे हटवण्याची डेडलाईन सरकारला दिली आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर त्याच दिवशी मुंबईत सोमय्या मैदानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. तर 30 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता भटके विमुक्त समाजाचा कृतज्ञता गौरव सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार संबोधित करणार आहेत.
जयंत पाटलांची टीका
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. एकदा गुजरातचं कौतुक करुन झालं आता युपीचं कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचं कौतुक करायला दौरे करतील.. दुसर्या राज्यात जाऊन त्या राज्यांचे कौतुक राज ठाकरे करतच राहणार आहेत. मुंबईतील हिंदी भाषिक मनसेच्या मागच्या वागण्यामुळे कितीतरी लांब जातील याची भाजपला माहिती आहे त्यामुळे भाजपकडून संघाने केलं म्हणून आम्ही करतोय अशी स्टोरी तयार व्हायला लागलेली दिसते, असे जयंत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपला सुनावले.