राजीनामा नामंजूर… आता चेंडू शरद पवार यांच्या कोर्टात; पक्षनेते भेटल्यावर शरद पवार म्हणाले काय म्हणाले?
समितीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी या नेत्यांनी शरद पवार यांना समितीचा निर्णय कळवला.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा निवड समितीने फेटाळून लावला आहे. शरद पवार हेच अध्यक्षपदी असावेत, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना जाऊन भेटले. त्यांनी समितीच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली. तुम्ही आमच्या निर्णयाचा आदर राखावा, अशी विनंती या नेत्यांनी शरद पवार यांना केली. त्यावर पवार यांनी मला विचार करायला थोडा वेळ द्या, असं समितीच्या नेत्यांना सांगितलं. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
समितीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी या नेत्यांनी शरद पवार यांना समितीचा निर्णय कळवला. तसेच पक्षाच्या अध्यक्षपदी तुम्हीच राहावे अशी गळ घातली. समितीच्या निर्णयाचा आदर करण्याची विनंतीही त्यांनी केली. तुम्ही सकारात्मक निर्णय घ्या. अंत पाहू नका, अशी विनंती या नेत्यांनी शरद पवार यांना केली. त्यावर पवार यांनी मला विचार करण्यास थोडा वेळ द्या, असं या नेत्यांना सांगितलं. त्यामुळे पवार संध्याकाळपर्यंत या प्रकरणावर निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पवारांनी म्हणणं ऐकलं
या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही शरद पवारांना निर्णय कळवला. पक्षाची आणि देशातील जनतेची भावना त्यांना कळवली. आम्ही मिटींगमध्ये जो प्रस्ताव मंजूर केला आहे, त्या प्रस्तावाचा आदर करा. पक्षातील नेत्याचा आदर करा. असं त्यांना सांगितलं. त्यावर मला थोडा वेळ द्या. मी विचार करून नंतर माझा निर्णय कळवतो, असं शरद पवार म्हणाले. त्यांना काही तासांचा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांना वेळ दिला आहे. पण त्यांनी आमचं म्हणणं सहानुभूतीपूर्वक ऐकलं. त्यांना वेळ दिला पाहिजे. लगेच प्रस्ताव मान्य करा असं म्हणू शकत नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अंत पाहू नका
राज्यातील आणि देशातील नेत्यांचा आग्रह आहे. तुम्हीच पक्षाचं नेतृत्व करावं अशी सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही निर्णयाचा फेरविचार करा आणि कायमस्वरुपी पक्षाचे अध्यक्ष राहा, अशी गळ आम्ही शरद पवार यांना घातली आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. तर आमचा अंत पाहू नका. आमचा निर्णय मंजूर करा, असं आवाहन आम्ही शरद पवार यांना केलं आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.