Rohit Pawar : ‘अजित पवार माझे काका, पण…’; अखेर पुतणे रोहित पवार यांनी चुलत्याबाबत ‘ती’ गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवली!
Rohit Pawar on NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता काका पुतण्याच्या वादात नातवाने मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या वर्षी दुसरा बळकट आणि कट्टर विरोधी राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष फोडला. अजित पवारांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना दगा दिला. अशातच शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जाहीरपणे अजित पवारांवर टीका केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवारांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटलं आहे की, आमदारांची यामध्ये काहीही चूक नाही, एका मोठ्या नेत्याने एखादी बैठक बोलावल्यावर नेते जातच असतात. पण, त्याच्यांकडून ज्या प्रकारे सह्या घेतल्या गेल्या. त्यानंतर बऱ्याच आमदारांना या बंडाची माहिती मिळाली. ज्या आमदारांना आधीच याबद्दल कळले त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
अजित पवार माझे काका असल्याने त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण त्यांच्यासोबतच्या काहींनी सत्ता असताना केंद्रात आणि राज्यात मंत्रीपद उपभोगली आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, 5 जूलैला होणाऱ्या बैठकीनंतर सर्व काही स्पष्ट होईल. 5 जूलैला म्हणजेच उद्या शरद पवार यांच्याकडून वाय. बी. चव्हाण सेंटर येथे 1 वाजता बैठकीचे आयोजन केलं आहे, तर अजित पवार यांनी बांद्रा येथील भूजबळ सिटी येथे बैठकीचे आयोजन केलं आहे. आता आमदार कोणत्या बैठकीत सामील होतात त्यावरुन पुढील समीकरण ठरणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.