NCP MLA Disqualification | ‘त्या’ एका चुकीमुळे शरद पवार यांच्या हातून पक्ष जाणार?

| Updated on: Jan 23, 2024 | 4:13 PM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी पहिल्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण केलाय.

NCP MLA Disqualification | त्या एका चुकीमुळे शरद पवार यांच्या हातून पक्ष जाणार?
ajit pawar sharad pawar ncp
Follow us on

मुंबई | 23 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज पहिला दिवस होता. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष नोंदवण्याचं काम सुरु झालं. सुरुवातीला शरद पवार गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारले. त्यानंतर अजित पवार गटाचे वकील प्रश्न विचारत होते. जितेंद्र आव्हाड यांच्या साक्षनुसार दोन्ही गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यामुळे कदाचित शरद पवार यांच्या हातून पक्ष तर जाणार नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण आपण पाहिलं. शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टाचा निकालही आपण पाहिला. या निकालात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. ते या चाचणीला सामोरे गेले असते तर उद्धव ठाकरे यांचं सरकार आम्ही जसंच्या तसं बहाल केलं असतं, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. तेव्हाची परिस्थिती पाहता राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेशच चुकीचा होता, असं म्हणत कोर्टाने तत्कालीन राज्यपालांना फटकारलं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हीच या प्रकरणातील मोठी चूक ठरली. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या प्रकरणार सुप्रीम कोर्टाने थेट निकाल न घेता विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा आदर करत त्यांच्याकडे सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले.

आता राष्ट्रवादीच्या प्रकरणात काही गोष्टी वेगळ्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणारे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत. पण शरद पवार हे पक्षात मनमानी करायचे, असे आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी केले आहेत. निवडणूक आयोगात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. त्याचबरोबर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरही सुनावणी सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सुनावणीपेक्षा राष्ट्रवादीचं प्रकरण काहीसं वेगळं आहे, हे सध्या तरी चित्र आहे.

या प्रकरणात एका मुद्द्यावरुन अजित पवार गट शरद पवार गटाला घेरण्याची चिन्हं दिसत आहे. त्याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी बघायला मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी देखील अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप केला होता. शरद पवार आपल्या मनमानीने पक्ष चालवायचे. ते अंतर्गत निवडणुका न घेता आल्या मनाने नियुक्त्या करायचे, असे आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. विधानभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष सुनावणीच्या दिवशी याच विषयी प्रश्न आज उपस्थित करण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या उत्तराने या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण केलाय.

जितेंद्र आव्हाड यांना नेमका काय प्रश्न विचारण्यात आला?

पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. पण जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दिलेलं स्पष्टीकरण हे महत्त्वाचं आहे. कदाचित हा मुद्दा अजित पवार गटाच्या फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. कारण जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतर्गत निवडणुकांचे कागदपत्रेच गायब झाल्याचा दावा केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं नेमकं उत्तर काय?

“पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. मात्र confidential कपाटात हे कागदपत्र ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही”, असं मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या सुनावणीत केला. याचा अर्थ पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे शरद पवार गटाकडे नाहीत. त्यामुळे ते पुरावे आपल्याकडे ठेवण्यात शरद पवार गट कमी पडली. या चुकीमुळे शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि पक्षाचं नाव जातं का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.