ठाकरे गटाकडून समर्थन, तर भाजप आक्रमक, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुन राजकारण पेटलं
जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं विधान मागे घ्यावं, त्यावर माफी मागावी नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसनं आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली आहे.
मुंबई : इतिहासावरुन जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केलं, त्यावर आपम ठाम असल्याची भूमिका आव्हाडांनी मांडलीय. पण त्यावरुन आज मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दुसरीकडे राष्ट्रवादीनं आव्हाडांच्या विधानाला वैयक्तिक मत ठरवलंय. तर ठाकरे गटानं आव्हाडांच्या विधानाचं समर्थन अयोग्य असल्याचं उत्तर दिलंय. पाहूयात.
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुन भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलं. आव्हाडांनी केलेलं विधान मागे घ्यावं, त्यावर माफी मागावी नाहीतर राष्ट्रवादीनं आव्हाडांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपनं केलीय.
आव्हाडांविरोधात भाजप कार्यकर्ते आंदोलन करण्याची माहिती पोलिसांना आधीपासून मिळाली होती. त्यामुळे जेव्हा कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जमले., तेव्हा घोषणाबाजीनंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आलं.
मात्र भाजपच्या आंदोलनाला उत्तर म्हणून त्यानंतर काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालात गेले. आणि तिथं जाऊन त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं. जितेंद्र आव्हाड मात्र त्यांच्या विधानावर ठाम आहेत. विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा करत त्यांनी भाजपला काही प्रश्नही केले आहेत.
दुसरीकडे आव्हाडांवरुन शिंदे गटानं ठाकरे गटाला टार्गेट केलंय. आव्हाडांचं विधान ठाकरे गटाला मान्य आहे का, असा प्रश्न शिंदे गटानं विचारलाय. यावर आम्ही आव्हाडांच्या विधानाशी सहमत नसल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय.