“तुम्ही शब्दांचे खेळ करू नका, लोकांना गंडवू नका”; राष्ट्रवादीच्या नेत्याची मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल…
आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या कदाचित एकत्र होतील आणि तिथेसुद्धा भाजप विरोधात लोकं मतदान करतील असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निकालावरून आता जोरदार रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसला मिळालेल्या विजयावरून आता महाविकास आघाडीला ऊर्जा मिळाल्याने आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी कर्नाटकाच्या निकालावरून एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, बदल हा लोकं करत असतात. त्यामुळे सत्ता संघर्ष सुरू होता आणि त्याला नऊ महिने होऊन गेले आहेत.
तसेच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना ते म्हणाले की, लोकशाहीच्या निर्णयाने जनता कौल देत असते त्यामुळे हा असाच बदल महाराष्ट्रात दिसणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये खूप मोठ्या मताने काँग्रेस सत्तेत आले आहे. त्यामुळे आगामी काळात कर्नाटकातील चित्र सगळ्या राज्यात दिसणार आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या निकालामुळे देशातील भाजपमध्ये अस्वस्थता दिसत आहे असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या कदाचित एकत्र होतील आणि तिथेसुद्धा भाजप विरोधात लोकं मतदान करतील असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील अनेक मोठे नेते कर्नाटकमध्ये प्रचारासाठी गेले होते. एवढी ताकद लावूनसुद्धा जनतेने काँग्रेसला मत दिले आहे.
त्यामुळे आता तुम्ही शब्दांचे खेळ करू नका,तसेच मुलगा कुठे बारसं कुठे. त्यामुळे तुम्हीदेखील पाळणा हलवायला गेलेला होतात पण तुमचा पाळणा हलला नाही, त्यामुळे लोकांना आता गंडवू नका असला टोलाही रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.