मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या धक्क्यानंतरही राष्ट्रवादीतले धक्कातंत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता अजित पवारांनी पक्षात जबाबदारी मागत नवा धक्का दिलाय. त्यामुळं अजित पवार प्रदेशाध्यक्ष होणार का यासाठी लॉबिंग सुरु झालंय. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष करा, अशी मागणी सुरू केली आहे. अजित पवार यांच्याकडे संघटनेची जबाबदारी देण्याची मागणी करण्यात आली. सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर अजित पवार सध्या अस्वस्थ आहेत. पक्षसंघटना ताब्यात घेतली तरच अजि पवार पुढं जाऊ शकतील. अशीही आमदारांची प्रतिक्रिया आहे.
राष्ट्रवादीच्या वर्धापनपदादिना निमित्तानं अजित पवारांनी केलेल्या मागणीनंतर अख्खी राष्ट्रवादी हबकून गेलीय. विरोधी पक्षनेते ऐवजी पक्षात काम करण्याची इच्छा अजित दादांनी व्यक्त केली आणि प्रदेशाथ्यक्ष बदलणार का या चर्चेनं जोर धरला. पक्षात प्रदेशाध्यक्षपदापेक्षा मोठं पद राज्यस्तरावर नाही. त्यामुळं अजित दादा प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं दिसून येतंय. पण सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मग काय जबाबदारी देणार असा प्रश्न पक्ष नेतृत्वासमोर उभा राहण्याची शक्यता आहे. पण तरीसुद्धा अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष व्हावे यासाठी आमदार आग्रही आहेत.
अजित पवार प्रदेशाध्यक्ष झाल्यास विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी ओबीसी नेत्यावर दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांची नावं चर्चेत आहेत. पण मुंडे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळं त्यांची वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. पण या माध्यमातून ओबीसी मराठा सुत्र जमवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करण्याची शक्यता आहे.
वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या टोलेबाजीनं पक्षात सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही. पण अजित पवार या मागणीतून पक्षावर पकड मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. पण शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष आणि अजित पवार प्रदेशाध्यक्ष झाल्यास विरोधकांना घराणेशाहीचा आरोप करण्यासाठी मोकळं मैदान मिळेल, अशी भीतीही राष्ट्रवादीला आहे.