मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी सकाळीच राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेत शिंदे-फडणवीस सरकामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाहीतर राष्ट्रवादीचे बडे आणि शरद पवारांचे अत्यंत खास असलेल्या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे इतर आमदारांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं. पवारांनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाच्या पुढील भूमिकेबाबत माहिती दिली.
जयंत पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंबाबत आता काळजी वाटत असल्याचं मिश्किलपणे म्हणत त्यांनी परत एकदा जाण्याची संधी असल्याचं सांगितलं.
एकनाथ शिंदे जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा अजित पवार हे अर्थमंत्री होते. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी देत नाहीत, असा आरोप करत एकनाथ शिंदेनी बंड केलं होतं, असं शिंदे म्हणाले होते. आता अजित पवार यांनीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने, एकनाथ शिंदे यांनी परत जायला एक संधी असल्याचा टोला पाटलांनी लगावला.
मला आता शिंदेंची काळजी वाटत आहे, कारण आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गेले त्यामुळे भाजपची राज्यात सत्ता आली, शिंदे जाताना 40 आमदार घेऊन गेले होते आता पवार किती आमदार घेऊन जातात हे दोन ते तीन दिवसात समोर येईलच. मात्र, शिंदेंना हा पर्याय शोधण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे त्यांनी याबाबत विचार करायला हवा, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदेंना सल्ला दिला आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. कारण शिंदेंना अजित पवार हा पर्याय असल्याचं बोललं जात आहे. भविष्यात शिंदेंना बाजू करत भाजपचा पवारांना सोबत घेऊन राज्यात सत्ता आणण्याचा प्लॅन असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.