मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करत आहेत. संसद असो की संसदेच्या बाहेर राहुल गांधी हे अदानींविरोधात सातत्याने बोलत असतात. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सातत्याने गौतम अदानी यांना भेटत असतात. त्यामुळे अदानी यांच्यावरून इंडिया आघाडीतच मतभेद असल्याचं उघड झालं आहे. शरद पवार हे गौतम अदानी यांची बाजू का घेतात असा प्रश्नही सातत्याने विचारला जात आहे. त्यावर शरद पवार यांनीच खुलासा केला आहे.
अदानींबाबत मतं मांडण्यासाठी राहुल गांधी स्वतंत्र आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. पण जेव्हा देशाच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा मी अदानी यांचंच समर्थन करेन, असं शरद पवार यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अदानी यांना उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपला देशातील वातावरण अनुकूल नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी त्यांनी मे महिन्यात कर्नाटकात झालेल्या निवडणुकीचा संदर्भ दिला. राज्यांमध्ये भाजपला अनुकूल वातावरण नाहीये. महाराष्ट्राचा विचार कराल तर आता निवडणुका झाल्यास राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार येईल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्याचा कौटुंबीक संबंधावर परिणाम झालाय का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. अजित पवार हे भाजपच्या सरकारमध्ये गेल्याने पक्षात फूट पडली आहे. पण त्याचा कुटुंबावर काहीच परिणाम झालेला नाही. आमचे खासगी आणि व्यावसायिक संबंध वेगवेगळे आहेत, असंही ते म्हणाले.
आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या कारवाईमुळे आप आणि काँग्रेस अधिक जवळ येईल, असं त्यांनी सांगितलं. संजय सिंह यांच्यावरील कारवाई ही सूडभावनेतून करण्यात आली आहे. जे नेते सरकारच्या इशाऱ्यावर चालत नाहीत, त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.